काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा ठराव महाराष्ट्र काँग्रेसने मंजूर केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रस्ताव काँग्रेसच्या बैठकीत ठेवला होता. त्याला सर्व काँग्रेसच्या प्रतिनिधींनी मंजूरी दिली. तसेच, काँग्रेस अध्यक्षाला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कोषाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, सदस्य निवडण्याचा अधिकार देणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव अशोक चव्हाण यांनी मांडला होता. त्याला सर्व काँग्रेसच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवत एकमताने मंजूर केला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडीचे अधिकार देण्याचा ठराव, नाना पटोले यांनी मांडल्याची माहिती मिळतं आहे. या ठरावालाही एकमताने सर्वांनी मंजूरी दिली आहे.
यापूर्वी तामिळनाडू काँग्रेस कमिटीने राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष स्वीकारण्याचा आग्रह केला होता. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. एस. अलागिरी यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो सर्व प्रतिनिधींच्या संमतीने मंजूर केला.