'महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग व मातोंड गावचा विकास करण्याची बुद्धी द्या'

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मातोंडची ग्रामदेवता व जागृत देवस्थान श्री देवी सातेरीच्या चरणी सांकडं !
Edited by: दीपेश परब
Published on: November 07, 2022 18:45 PM
views 263  views

वेंगुर्ले : विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी मातोंड गावची ग्रामदेवता व जागृत देवस्थान श्री देवी सातेरीच्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यासहित सिंधुदुर्ग व या मातोंड गावचा विकास करण्याची बुद्धी मला देवो, असे श्री देवी सातेरीकडे साकडे घालत मातोंड गावातील या जत्रेला येऊन "खाज" खात खात लोटांगण बघणे, जत्रेत आल्यावर उसळपाव खाणे तसेच इकडची खेळणी खरेदी करणे अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला.

    यावेळी समस्त गावकर मंडळींच्या वतीने पश्चिम देवस्थान कमिटीचे माजी सदस्य हिरोजी उर्फ दादा परब यांनी ऍड नार्वेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान केला. तर दादा परब यांनी नार्वेकर कुटुंबाचे मातोंड गावशी खूप जुने संबंध असून गावच्या व देवस्थानच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. 

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजू नाईक, प्रमुख गावकर उदय परब, रमाकांत परब, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, पं स माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, सोसायटी संचालक ज्ञानेश्वर केळजी, एम जी मातोंडकर, विद्याधर तावडे, डॉ भालचंद्र कांडरकर, रविकिरण परब, ताता मेस्त्री, रावजी परब, किशोर परब, सुधाकर परब, मातोंड तालाठी श्री गुरव यांच्यासाहित सर्व गावकर मंडळी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

   या वेळी सत्काराला उत्तर देताना ऍड नार्वेकर म्हणाले की, श्री देवी सातेरीचा आशीर्वाद व कृपा सातत्याने आमच्या नार्वेकर कुटुंबावर आहे. गेले ३० ते ४० वर्ष आमचं संपूर्ण परिवार या जत्रेसाठी येतो. आणि आज विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री सातेरीच्या दर्शनासाठी येण्याची संधी मला प्राप्त झाली. निश्चितच मातोंड गावच्या विकासासाठी झुकत माप मिळेलच त्याच बरोबर पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास या विधानसभेच्या कार्यकाळात होईल असे त्यांनी आश्वासनही दिले.