मुंबई : मुंबईतील खारघर येथे राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात लाखोंच्या संख्यनेने श्री सदस्य उपस्थित होते. मात्र भर उन्हात झालेल्या या कार्यक्रमात उष्माघातामुळे 11 सदस्यांचा झाला, तर अत्यवस्थ असलेल्या अनेक सदस्यांवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस केली. तसेच राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
ढिसाळ नियोजनामुळे कार्यक्रमाला गालबोट लागलं - उद्धव ठाकरे
दरम्यान या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची भेट घेतली. रुग्णांची विचारपूस केल्यानतंर उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाची चुकीची वेळ आणि ढिसाळ नियोजनामुळे या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं, अशी टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांना जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम भर दुपारी घेतला असेल तर चौकशी कोण कोणाची करणार? शाह यांना जायचं होतं म्हणून जर दुपारच्या वेळेत कार्यक्रम घेतला गेला असेल तर हा विचित्र प्रकार आहे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
हलगर्जीपणामुळे काय घडू शकते हे पाहायला मिळाले - अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील रुग्णांची विचारपूस केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले "हलगर्जीपणा झाल्यावर काय घडू शकते, हे आजच्या घटनेवरून महाराष्ट्राला पाहायला मिळालं. किती मृत्यू झालेत हे अजून कळत नाहीये. आम्हाला कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं कोणताही आकडा लपवायचा नाही".
तसेच "कार्यक्रम संपल्यानंतर थोडी गर्दी झाली आणि त्यात चेंगराचेंगरी झाली असे काही सांगतायत. उन्हाळा भरपूर आहे आणि अशातच कार्यक्रमाची वेळ दुपारी निवडणे हे आयोजकांचं चुकलेलं आहे. हे का घडलं, कोणी हलगर्जीपणा दाखवला, कोणी दुर्लक्ष केले? या सर्व गोष्टी नंतरच्या. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. कार्यक्रमाला 14 कोटींचा बजेट होतं. सरकारने एवढी रक्कम खर्च केली तर अशा घटना घडायला नको होत्या", असेही अजित पवार म्हणाले.
घटनेची चौकशी व्हावी, अंबादास दानवे यांची मागणी
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'ही दुर्दैवी घटना आहे. मी मृतांना आदरांजली वाहतो. कार्यक्रम हा सायंकाळी घ्यायला हवा होता. कार्यक्रमाची वेळ चुकली'. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.