महाराष्ट्र विधानसभा सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात

भाजपचे सोशल मीडिया संयोजक अविनाश पराडकर यांची माहिती
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 26, 2022 11:59 AM
views 138  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर ६ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा भेटीसाठी येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत ते संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. जिल्ह्यातील नावाजलेल्या संस्था व प्रकल्पाची माहितीही ते जाणून घेणार आहेत. भारतीय जनता पार्टी ही अधिक लोकभिमुख व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सामान्य जनतेचा विकास विविध योजनांमधून तळागाळात पोहोचला पाहिजे, यादृष्टीने ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे अधिकृत सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती भाजपा सोशल मीडिया रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांनी दिली.

सभापती राहुल नार्वेकर यांनी नुकतीच गोवा येथे डिचोली विधानसभा मतदार संघाला भेट दिली. यावेळी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डिचोली भाजपाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे मीडिया संयोजक अविनाश पराडकर व पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेत जिल्ह्यातील सद्यस्थिती व समस्यांबाबत चर्चा केली व सिंधुदुर्ग भेटीसाठी आमंत्रण दिले. सभापती राहुल नार्वेकर यांनी ६ नोव्हेंबरला सावंतवाडी व कुडाळ तालुक्याना भेट देण्यास संमती दिली आहे. सभापती नार्वेकर हे सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने त्यांची महाराष्ट्र विधानसभा सभापतीपदी झालेली निवड ही सिंधुदुर्गवासीयांसाठी आनंदाची व अभिमानस्पद घटना आहे. यानिमित्ताने त्यांचा या भेटीदरम्यान सिंधुदुर्गवासियांतर्फे शानदार सत्कार करण्यात येणार आहे.