सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या (मॅग्मो) राज्य अध्यक्षपद, सचिव आणि कोषाध्यक्षपदाची निवडणूक होत असून राज्य अध्यक्षपदाची निवडणूक ९ एप्रिलला होत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सध्या रत्नागिरी मॅग्मोचे अध्यक्ष असलेले डॉ. बी. एन. पितळे रिंगणात असून त्यांनी नुकताच सिंधुदुर्गचा दौरा केला. या दौऱ्यात सिंधुदुर्गचे देवदुत त्यांच्या पाठीशी असल्यानं मोठी ताकद त्यांच्या मागे उभी राहिली आहे. डॉ. पितळे आणि यवतमाळ येथील डॉ. विजय आकोलकर यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होत आहे. दरम्यान, डॉ. पितळेंनी प्रचारात आघाडी घेतलीय. डॉक्टरांच्या न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्यानं महाराष्ट्रात सध्या त्यांचं पारडं जड मानल जात आहे.
राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नावर डॉ. पितळे यांनी आजवर आवाज उठविला आहे. त्यांनी सिंधुदुर्गात सावंतवाडी, देवगड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. मालवण, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यात देखील वैद्यकीय सेवेत योगदान दिले आहे. भविष्यात डॉक्टरांच्या आठ तास ड्युटीच्या प्रश्नी कमिशन नेमणुकीचा आपला प्रयत्न राहणर आहे. सन २००९-१० मध्ये सेवेत आलेल्या डॉक्टरांना त्या काळात एमपीएससीमार्फत भरती न झाल्याने अनेक लाभांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यांचे समावेशन करण्यात आले. मात्र, त्यांना लाभ दिलेले गेले नाहीत. सेवा गृहित धरणार नाही, असे त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले होते. त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. पितळे यांनी सांगितले.वैद्यकीय अधिकाऱ्यांना सध्या सहाव्या वेतन आयोगानुसार एनपीए दिला जातो. तो सातव्या वेतन आयोगानुसार मिळावा, असा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. पितळे यांनी सांगितले. काहींचा पूर्वलक्षी प्रभावाने पेन्शनचा प्रश्न प्रलंबित आहे. तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही डॉ. मा पितळे यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सक्षम बनवून त्यांच्यात सचोटी आणि शिस्त यांचा अंगिकार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस डॉ. पितळे यांनी व्यक्त केला.