LPG Cylinder Price | सिलिंडर महागला | जाणून घ्या नवे दर

होळीपूर्वी सर्वसामान्यांना पुन्हा महागाईची झळ
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 01, 2023 09:44 AM
views 492  views

नवी दिल्ली : आज मार्च महिन्याचा पहिला दिवस आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा धक्का बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली असून आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर १०५२.५० रुपयांवरुन थेट ११०२.५० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. तर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी आता सर्वसामान्यांना ११०३ रुपये मोजावे लागणार आहे. अशाप्रकारे होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.


या निर्णयामुळे स्वयंपाक करण्यासाठी घरगुती तसेच रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या खर्चात वाढ होईल. म्हणजे घरी स्वयंपाक करून जेवणे आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणे हे दोन्ही आता महागले आहेत. लक्षात घ्या की नियमानुसार जर तुम्ही सबसिडी घेतली असेल तर घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दरवर्षी १४.२ किलो वजनाचे १२ सिलेंडर सबसिडाइज्ड रेटमध्ये अर्थात सवलतीच्या दरात मिळतील. तर अतिरिक्त सिलेंडरसाठी घरगुती वापराच्या सिलेंडरचे नवे दर लागू होणार आहेत.


व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाली असून त्याची किंमत तब्बल ३५०.५० रुपयांनी वाढली आहे. ३५०.५० रुपयांनी महागल्यानंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत २११९.५० रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.


यापूर्वी १ जुलै २०२२ रोजी घरगुती सिलिंडरच्या किमती बदलल्या होत्या. म्हणजे आज सुमारे ८ महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. अशाप्रकारे गेल्या वेळी जुलैमध्येच घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती तर त्यानंतर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ झाली नाही.


गेल्या काही वर्षांत एलपीजीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार १ एप्रिल २०१७ ते ६ जुलै २०२२ दरम्यान एलपीजीच्या किमती ५८ वेळा बदलण्यात आल्या असून याचा परिणाम म्हणजे एलपीजी सिलिंडरच्या दरात ४५ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल २०१७ रोजी एलपीजी सिलिंडरची किंमत ७२३ रुपये होती तर जुलै २०२२ पर्यंत त्यात ४५% वाढ होऊन किमती १,०५३ रुपयांवर पोहोचल्या.