मुंबई : ‘लव्ह जिहाद’ च्या मुद्द्यावर सबळ पुरावे देत भाजपा आमदार नितेश राणे यांनी याविरोधात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चा फॉर्म्यूला वापरून अबू आझमी आणि जितेंद्र आव्हाडांवर जोरदार प्रहार केला. “तुम्ही आमदार नंतर आहात, पण पहिले तुम्ही एका मुलीचे वडील आहात…”, असा नितेश राणे यांनी निशाणा साधला.
‘लव्ह जिहाद’ वरून राज्यात सध्या वातावरण तापलेले असताना समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि आमदार नितेश राणे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच विधानसभेच्या आवारात खडाजंगी पहायला मिळाली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत आपण यावर योग्य उत्तर देणार असल्याचे आव्हान नितेश राणे यांनी दिले होते.
आज पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी लव्ह जिहादचा एक व्हिडीओ दाखवून अबू आझमींवर हल्लाबोल केला. या व्हिडीओमध्ये मुस्लिम समाजाच्या महिलाच धर्मांतराबाबत बोलताना दिसत आहेत. लव्ह जिहादची प्रकरण खोटी असल्याचे सांगत लव्ह जिहाद होतंच नाही असं सांगणाऱ्या अबू आझमींनी हे व्हिडीओ पहायला हवेत, असा टोला देखील त्यांनी लगावला. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना त्यांचा ‘मुंब्र्याचे जितोद्दीन’ असा उल्लेख केला. त्यांनी सुद्धा हा व्हिडीओ एकदा पाहावा, असे देखील नितेश राणे म्हणाले.
या मुद्द्यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, हिंदू मुलींचे आयुष्य बरबाद होत आहेत. जर तरूणाला हिंदु मुलींशी लग्न करायचे असेल तर त्यासाठी धर्मांतराची काय गरज आहे? तिने हिंदू देवी-देवतांची प्रार्थना बंद करण्याची तिच्यावर जबरदस्ती करण्याची काय गरज आहे? असा सवाल देखील यावेळी नितेश राणे यांनी उपस्थित केला. जर प्रेम असेल तर हिंदू म्हणून प्रेम करावे. पण तसे न करता जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रकार यालाच लव्ह जिहाद म्हणतात. लग्न कोणीही कुणाबरोबर करा. त्यावर आमचा आक्षेप नाही. पण लग्नानंतर धर्म बदलला जातो. मुलीने कुराण वाचावे. हिंदू देव देवतांचे फोटो ठेवू नयेत, असा तिच्यावर दबाव टाकला जातो. यावर आमचा आक्षेप आहे, असे देखील नितेश राणे म्हणाले.
तसेच या प्रकरणात योग्य पुरावे कोर्टात दाखल करण्यात आले असल्याचे नितेश राणेंनी सांगितले. लव्ह जिहाद करणाऱ्यांना घाबरवले जाते, मग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार तरी कशा नोंदवल्या जाणार आणि मग लव्ह जिहादचे कोणतेच प्रकार घडले नाहीत, असे सांगायचे, असा हा गंभार प्रकार सुरू असल्याचे देखील नितेश राणेंनी सांगितले.
यावेळी नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाढांवरही निशाणा साधला. “तुम्ही आमदार नंतर आहात, पण पहिले तुम्ही एका मुलीचे वडील आहात… एका हिंदु मुलीचे वडील आहात. तुम्ही बोलण्याआधी विचार करायला हवा. राज्यातील असंख्य मुलींचे आयुष्य लव्ह जिहादमुळे खराब होत आहे. हे कुणासोबतही घडू शकते. जितेंद्र आव्हाढ आणि अबू आझमींनी केलेल्या वक्तव्यामुळे असंख्य जिहादी विचारांच्या लोकांना समर्थन मिळत असल्याचा आरोप देखील यावेळी नितेश राणे यांनी केला.