कणकवली : राजापूर बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या महिनाभरात सुरू होईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे शक्य होत असून प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांचा विकास होणार आहे. यातून देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने आपण मागणी केल्यानुसार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयटीआयमध्ये सुरू करण्याच्या अनुषंगाने अधिवेशानंतर बैठक होऊन निश्चित करण्यात येईल, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले असल्याची माहिती माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.
कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार बोलत होते .यावेळी त्यांच्या समवेत शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,पपू पुजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बोलताना श्री. जठार म्हणाले, २०१६-१७ पासून आपण रिफायनरीसाठी प्रयत्न करत आहोत. एवढ्या अथक प्रयत्नानंतर आता हा प्रकल्प होण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी मोठे सहकार्य केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून किमान १ ते २ लाख मुलांना रोजगार मिळेल. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१०० गावे आहेत. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांना स्किल डेव्हलमेंट मध्ये आताच आयटीआय मधून प्रशिक्षित मनुष्यबळ विकास केला पाहिजे.
या प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना यासाठी प्रशिक्षणाची गरज असून त्यासाठीच आपण कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी केली असल्याचे श्री. जठार म्हणाले.ना.मंगलप्रभात लोढा यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक लावू,या बैठकीला कोकणातील आमदार उपस्थित राहणार आहेत,असे प्रमोद जठार यांनी सांगितले.