स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 27, 2023 18:08 PM
views 330  views

वैभववाडी : महाराष्ट्र राज्याच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी सांगुळवाडी प्राथमिक शाळा नं. १ च्या शिक्षिका स्नेहलता राणे यांची निवड झाली. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबई येथील रंग शारदा सभागृहात या पुरस्काराचे वितरण झाले. सौ. राणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

तालुक्यातील सांगुळवाडी शाळेवर सौ. राणे ह्या पदवीधर शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत. एक उपक्रमशील शिक्षीका म्हणून त्यांची ओळख आहे. साध्या, सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. मुलांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान याची आवड निर्माण व्हावी यादृष्टीने त्यांचे अध्ययन असते. शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन यासारखे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात तरबेज करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. त्याचे मुंबईत वितरणही झाले. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर वैभववाडी शिक्षण विभाग, विविध शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले.