सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील रुग्णालयांच्या समस्यांबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासमवेत शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची विधानभवन नागपूर येथे बैठक पार पडली. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. कोकणसह सिंधुदुर्गच्या आरोग्याविषयी कोकणसादनं आवाज उठवला होता. याची दखल लोकप्रतिनिधींनी घेतली होती. आरोग्याची ही समस्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेत दुर करू असा शब्द दिला होता.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या या बैठकीत तिन्ही तालुक्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयातील रिक्तपद भरण्यासाठी प्रामुख्याने चर्चा झाली. विशेष तज्ञांची पद देखील भरली जाणार आहेत. तर सावंतवाडीतील भुलतज्ञांचे थकीत मानधन अदा केल जाणार आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच मानधन देखील डिसेंबर अखेरपर्यंत काढलं जाणार आहे. डॉक्टरांना क्वार्टर्स बांधून देण्यासाठीची चर्चा देखील या बैठकीत झाली. तर वेंगुर्ला, दोडामार्गात शवविच्छेदन गृहासाठी प्रस्ताव करण्याची सुचना केली. तिन्ही तालुक्यातील रूग्णालयातील समस्या कायमस्वरूपी दुर करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.