कोकणातल्या पहिल्या BPO सेंटरचा सावंतवाडीत शुभारंभ !

व्हरेनियम क्लाऊड आणि सेक्युर क्रेडेन्शियल्सचा उपक्रम
Edited by: भरत केसरकर
Published on: January 19, 2023 18:16 PM
views 243  views

सिंधुदुर्ग : व्हरेनियम क्लाऊड आणि सेक्युर क्रेडेन्शियल यांच्या माध्यमातून कोकणात  पहिल्यांदाच बीपीओ सेंटर   सावंतवाडीत आजपासून सुरु झाले. यासाठी लागलीच २५ उमेदवारांना संधी देखील देण्यात आलेली आहे. सोमवारपासून ते कामाला सुरुवात करणार आहेत. या बीपीओ सेंटरमुळे स्थानिक मुलांना चांगल्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याचे सेक्युर क्रेडेन्शियल्सचे राहुल बेलवलकर यांनी दिली.


बीपीओ किंवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) ही एक प्रकारची आउटसोर्सिंग प्रकिया आहे. ज्यामध्ये व्यवसायातील एका विशिष्ट प्रक्रियेचे संचालन व व्यवस्थापन तिसऱ्या कंपनीला सोपविले जाते व त्या संदर्भात एक करार केला जातो. भारतात बीपीओ हा एक मोठा उद्योग असून त्यापासून दरवर्षी सुमारे ११ अब्ज डॉलर रेव्हेन्यू मिळतो व लाखो लोकांना रोजगार मिळतो. सिंधुदुर्गातील मुलांना येथेच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी व्हारेनियम क्लाउड्सचा सहकार्याने सेक्युर क्रेडेन्शियल्सने असेच एक बीपीओ  सावंतवाडीमध्ये सुरु केले आहे. त्यामुळे येथील मुलांना जिल्ह्यातच रोजगार संधी उपलब्ध झाली आहे, असे राहुल बेलवलकर यांनी सांगितले.  

 श्री. बेलवलकर म्हणाले, मोठ्या कंपन्यांना जे उमेदवार लागतात, त्यांची वैयक्तिक माहिती या बीपीओच्या माध्यमातून पूर्णपणे तपासली जाणार आहे. त्यात त्यांच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, फिझिकल व्हेरीफिकेशन त्यांना जॉबसाठी कॉल करणे यासर्व गोष्टी  बीपीओच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. भविष्यात या गोष्टी एकेक करून सुरु होतील. पण याठिकाणी  डेटा एंट्रीपासून सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसात क्यू,सी. प्रोसेस सुद्धा सुरु करण्यात येणार आहे. 

 मुलांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळाला तर तो हवा असतो. हा दृष्टिकोन ठेवून सेक्युर क्रेडेन्शियल्सने  रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी व्हॅरॅनियमशी टाय अप केलं आहे. सेक्युर क्रेडेन्शियल्स यांनी जेव्हा याची सुरुवात केली होती तेव्हा मोजक्याच  उमेदवारांची निवड केली होती. पण तो अनुभव खूप हुरूप वाढवणारा होता. त्यामुळे सावंतवाडीमध्ये अलीकडेच जो रोजगार मेळावा झाला त्यात १५ उमेदवारांची निवड करण्यात आली. पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये किमान शंभर उमेदवार या  बीपीओमध्ये  असावीत असे उद्दिष्ट सेक्युर क्रेडेन्शियल्सने ठेवले आहे. त्याचा फायदा येथील मुलांनाच होणार आहे. 

श्री. बेलवलकर म्हणाले, विशेषतः सेवा क्षेत्रात येथील स्थानिक मुलांना खूप कमी संधी उपलब्ध असतात. पण आम्ही आज जे बीपीओ सेंटर सुरु केले आहे त्यातून मुलांना मोठा फायदा तर होईलच पण ते एक आदर्श बीपीओ सेंटर ठरेल. या बीपीओ सेंटरचा आदर्श घेऊन भविष्यात अनेक बीपीओ सेंटर येथे सुरु होतील. मुलाना रोजगाराच्या स्थानिक संधी मिळतील हा याचा मोठा फायदा असेल. 

    सावंतवाडीमध्ये अलीकडेच जो रोजगार मेळावा झाला त्यातून अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. ज्या कंपन्या याठिकाणी सहभागी झाल्या होत्या त्यांनी येथील उमेदवारांच्या पात्रतेविषयी  समाधान व्यक्त केले. त्यामुळे भविष्यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. त्यातून स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुंबईच्या तुलनेत येथील स्थानिक मुलांचा विचार केला तर येथील मुले खूप सिन्सियर आहेत. हुशार आहेत. मुंबईमध्ये रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध असल्याने नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण जास्त आहे. पण सिंधुदुर्गात तसे नाही.  त्यामुळेश सेक्युर क्रेडेन्शियल्सने कोकणात बीपीओ सेंटर उभारायचे निश्चित केले आहे. 

    मुंबईमध्ये अशा अनेक प्रकारच्या बीपीओ आहेत. पण मुंबईच्या तुलनेत येथील मुले हि मेहनती आहेत. मुलांची शैक्षणिक पात्रता खूप चांगली आहे. त्यामुळे मुंबईत एखादा बीपीओ उभारण्यापेक्षा सावंतवाडीसारख्या ठिकाणी अशी बीपीओ सेंटर्स उभारणे सेक्युर क्रेडिन्शियल्सने पसंत केले. त्यानुसार आज सावंतवाडीत कोकणातील पहिल्या  बीपीओ सेंटरचा शुभारंभ झाला आहे असे सेक्युर क्रेडेन्शियल्सचे श्री. बेलवलकर यांनी सांगितले.