कोकण रेल्वे गणेशोत्सवासाठीच्या गाड्या 2 ते 3 तास उशिरा

Edited by: ब्‍युरो न्यूज
Published on: August 24, 2025 18:35 PM
views 93  views

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून, रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असला तरी वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक गाड्या तासन्‌तास उशिराने धावत आहेत, परिणामी कोकणात जाणारे प्रवासी स्थानकांवर ताटकळत उभे आहेत.

कोकणामध्ये येणाऱ्या मुंबईस्थित कोकणवासीय आता मोठ्या संख्येने कोकणामध्ये दाखल होत आहेत. पण कोकण रेल्वेने ज्यादा गाड्या सोडल्याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला आहे. त्यामुळे कणकवली रेल्वे स्थानकात सकाळी मेंगलोर एक्सप्रेस तसेच कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस व जनशताब्दी एक्सप्रेस यांच्यासह अन्य स्पेशल गाड्या या दोन ते तीन तास उशिरा येत असल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असल्याचे दिसत आहे.

यंदा २२ ऑगस्टपासून ३८० गणेशोत्सव विशेष गाड्या कोकण मार्गावर धावत आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ही व्यवस्था करण्यात आली आहे. आरक्षण फुल्ल झाल्याने रेल्वेने अनारक्षित गाड्याही सुरू केल्या आहेत. या गाड्यांना कोलाड, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार आणि उडुपी अशा प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. एकाच वेळी इतक्या गाड्या चालवल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर ताण आला आहे. परिणामी, नियमित आणि विशेष गाड्या दोन्ही उशिराने धावत आहेत. मांडवी एक्सप्रेससारख्या गाड्यांनाही मोठा उशीर होत आहे.

कोकण रेल्वेवरील वेळापत्रक कोलमडल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जादा गाड्यांची व्यवस्था असली तरी नियोजनातील त्रुटी, ट्रॅकवरील ताण आणि अपुरी माहिती यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा सण असला, तरी यंदा रेल्वे प्रवासाचा अनुभव मात्र अनेकांसाठी त्रासदायक ठरला आहे.