
सावंतवाडी : पत्रकार दिनानिमित्त 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस कोकणचे नं. 1 महाचॅनेल कोकणसाद लाईव्ह आणि कोकणचे पहिले दैनिक कोकणसाद यांच्यावतीनं अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ संपादक गजानन नाईक तसेच ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यु लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार विजेते, कोकणसाद LIVE चे सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गांवस आणि ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार विजेते अभिमन्यु लोंढे यांचा पुरस्कार मिळाल्याबददल कोकणसाद LIVE च्या वतीने गजानन नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कोकणसाद LIVE चे कार्यकारी संपादक अर्जुन धस्के, उपसंपादक प्रा. रूपेश पाटील यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यकारी संपादक अर्जुन धस्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यु लोंढे म्हणाले, की आजची पत्रकारीता अधिक संघर्षमय आहे. नव्या पिढीतील पत्रकारांनी अत्यंत अभ्यासपूर्वक जनतेचे प्रश्न हाताळणे आवश्यक आहे. पत्रकारांच्याही काही समस्या आहेत. त्यासाठी संघटीत राहण्याची गरज आहे.

ज्येष्ठ संपादक गजानन नाईक म्हणाले, पत्रकारीतेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. अन्य तीन स्तंभांपेक्षा हा स्तंभ वेगळा समजला जातो. प्रत्यक्षात मात्र आजही पत्रकारांना अनेक समस्यांना आजही सामोरे जावे लागते, त्यावेळी चौथा स्तंभ म्हणुन प्रशासनाकडुन आदर ठेवला जात नाही. आपल्याला आपले हक्क आणि अधिकारी मिळवायचे असतील तर संघटीत राहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संघटना हेच एकमेव माध्यम आहे. त्याचबरोबर लोकशाही मार्गाने कोणी शासकीय अधिकारी ऐकत नसेल तर त्याच्याशी संघर्ष करण्याचीही तयारी आपण ठेवायला हवी.

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यु लोंढे आणि विनायक गांवस यांचेही पुरस्काराबददल अभिनंदन करून त्यांनी दोन पिढीतील पत्रकारीतेबाबत मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन विनायक गावस यांनी केले तर प्रा. रूपेश पाटील यांनी आभार मानले.














