सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूकांनंतर आता राज्यात २६ जून रोजी विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेनं माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. 4 जागांकरिता निवडणूक होत आहे. 26 जून 2024 रोजी मतदान होणार असून 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. यात कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच आता सुटला आहे. शिवसेना उमेदवार संजय मोरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनीदेखील माघार घेतली. मनसेने उमेदवार जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याकडे अभिजीत पानसे यांची उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. फडणवीस यांच्या विनंतीचा मान ठेवून राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही उमेदवारानं माघार घेतल्याने आता महायुतीचे उमेदवार असणाऱ्या निरंजन डावखरेंचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही जागा काँग्रेसला देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस उमेदवाराला शिवसेना उबाठा पाठिंबा देणार असल्याची माहिती प्रवक्ते संजय राऊत दिली आहे. त्यामुळे आता महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा हा सामना रंगणार असून विद्यमान आमदार निरंजन डावखरे आपला गड शाबूत राखतात की कॉंग्रेसचे रमेश कीर हा गड सर करतात ते १ जुलैला स्पष्ट होणार आहे.