कोकण चित्रपट महोत्सव ११ ते १६ डिसेंबरला रंगणार !

'सिंधुरत्न कलावंत मंच'च्यावतीने आयोजन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 21, 2023 20:47 PM
views 217  views

मालवण : 'सिंधुरत्न कलावंत मंच' यांच्या वतीने दुसरा कोकण चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात ११ ते १६ डिसेंबर दरम्यान कोकणात रंगणार आहे. याचे उद्घाटन ११ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार आहे. त्यानंतर मालवण येथे १२ रोजी पासून १६ डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. १६ रोजी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


हॉटेल ऐश्वर्य येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, सिंधुरत्न कलावंत मंचाचे सचिव विजय राणे, सहखजिनदार प्रमोद मोहिते, सदस्य मनोहर सरवणकर, हार्दिक शिगले, पर्यटन व्यावसायिक संघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, अवि सामंत, गुरू राणे, नाट्य दिग्दर्शक तथा जेष्ठ कलावंत दादा कांदळगावकर, दशावतार कलेतील कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, कला दिग्दर्शक रूपेश नेवगी, गोगटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आनंद मळेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


महोत्सवात मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी नामवंत असे दहा चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याचबरोबर स्थानिक कलावंतांचीही अदाकारी रसिकांना पहायला मिळणार आहे, असे श्री. पाटकर यांनी स्पष्ट केले. या महोत्सवाला मालवण पालिका आणि पर्यटन महासंघाचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.


सचिव विजय राणे यांनी संपूर्ण महोत्सवाची रूपरेषा स्पष्ट करताना स्थानिक कलावंतांना मोठ्या पडदयावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत असे सांगितले. यावेळी नामवंत कलाकार केळुसकर, चव्हाण, कांदळगावकर यांच्याहस्ते केक कापुन महोत्सवाच्या नियोजनाचा शुभारंभ करण्यात आला.


सकाळच्या सत्रात नाट्यगृहामध्ये चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आणि संध्याकाळी स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम होणार आहेत. दिवसभर पर्यटक आणि रसिक यामध्ये सहभागी होतील असे नियोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव कोकणातील कलाकारांना पुढे नेण्याचा आणि नवनविन संधी उपलब्ध करून देणार असल्याने या संपूर्ण कार्यक्रमाचे पालकत्व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घ्यावे, यासाठी कलावंत मंचाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे श्री. पाटकर यांनी स्पष्ट केले.


हा महोत्सव म्हणजे रसिकांना चित्रपट गृहांकडे नेण्यासाठी एक प्रयत्न आहे. सिंधुदुर्गातील सर्वच तालुक्यात या महोत्सवातील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात चित्रपटगृह सुरू व्हावेत आणि कलाकारांना संधी मिळताना येथील रसिकांचेही प्रोत्साहन मिळावे यासाठी सिंधुरत्न कलावंत मंच प्रयत्नशिल आहे.

मालवण पालिकेच्या सहकार्याने गतवर्षी चांगल्याप्रकारे हा महोत्सव झाला होता. याहीवर्षी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे सहकार्य मिळत असल्याने आणि पर्यटन महासंघही पाठिशी असल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही श्री. पाटकर यांनी सांगितले.

हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी मॉरिशस जाण्याचा कल वाढला आहे. मात्र मॉरिशसपेक्षा मालवण किनारपट्टी येथील पर्यटन अधिक विलोभनीय आहे. यामुळे चित्रपट क्षेत्राला कोकणातील सौंदर्य दाखविण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. जेणेकरून याठिकाणी हिंदी आणि मराठी चित्रपटांचे चित्रीकरण सुरू झाले तर कोकण एका वेगळ्याच उंचीवर पोहचणार आहे, असा विश्वासही श्री. पाटकर यांनी व्यक्त केला. या महोत्सवात नामवंत मराठी कलाकारांना निमंत्रीत करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.