किरण सामंत - देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं ?

Edited by: ब्युरो
Published on: April 15, 2024 04:46 AM
views 721  views

मुंबई : धनुष्यबाण चिन्हावर मी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे असं उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी म्हटलं आहे. त्यांनी याच संदर्भात रविवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याच महिन्यात ३ एप्रिलला त्यांची एक पोस्ट व्हायरल झाली होती ती पोस्ट होती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याची. मात्र त्यावर कुठलीही प्रतिक्रिया किरण सामंत यानी दिली नव्हती. आता किरण सामंत यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत असं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे किरण सामंत यांनी?

“उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक पार पडली. त्या बैठकीत विदर्भातल्या काही जागांवर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाविषयीही चर्चा झाली. यावेळी भाजपाने देशात ४०० पारचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा हे करायचं असेल तर रत्नागिरी - सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच मतदार असला पाहिजे हे मत घेऊन मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो.”

कमळ चिन्हावर लढणार नाही

कमळ चिन्हावर लढवणार का हे विचारलं असता किरण सामंत म्हणाले, “मी कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार नाही. कोकणात कमळ चिन्हापेक्षा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणं संयुक्तिक आहे. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे. मी आज देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलो आहे. देवेंद्र फडणवीस जो निर्णय देतील तो मला मान्य असेल.” असंही सामंत म्हणाले आहेत.