
कुडाळ : कुडाळच्या विकासात कोणतीही नकारात्मकता आड येऊ देणार नाही. केवळ मंत्र्यांसमोर हात बांधून उभे न राहता मतदारसंघासाठी हक्काचा निधी कसा आणावा, हे आम्ही दाखवून दिले आहे. माजी आमदारांची भूमिका ही केवळ प्रतिशोध घेणाऱ्या 'शकुनी'सारखी आहे. या नकारात्मक वृत्तीमुळेच त्यांचा विनाश होत आहे. आम्ही दोनदा पराभूत झालो, पण कधीही बदला घेण्याचे राजकारण केले नाही अशी जोरदार टीका आमदार निलेश राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली.
कुडाळ नगरपंचायत व पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या गणेश घाट व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कुडाळ शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटनात मोलाची भर घालणारा हा प्रकल्प आगामी गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी व सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
विरोधकांच्या श्रेयवादावर उत्तर देताना आमदार निलेश राणे म्हणाले, "कोणत्याही शासकीय कामाचा जीआर व निविदा महत्त्वाची असते. गणेश घाट कामाचा जीआर २२ जून २०२५ रोजी निघाला, निविदा १ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आणि भूमिपूजन २९ ऑक्टोबर २०२५ रोजी झाले. सर्व प्रशासकीय ऑर्डर्स माझ्याच कार्यकाळात निघाल्या असून, आम्ही पुराव्यासह काम करून दाखवतो."
आमदार निलेश राणे यांनी आगामी काळात मच्छिंद्र कांबळे नाट्यगृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि डीपीआर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला. नगरपंचायत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना सल्ला देताना ते म्हणाले, "आपण जनतेचे मालक नसून सेवक आहोत. आपसातील मतभेद बाजूला ठेवून कुडाळच्या सुशोभीकरणासाठी दर्जेदार काम करा." तसेच मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या ५ ते ८ महत्त्वाच्या विकासकामांचा तात्काळ पाठपुरावा करून ती कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी स्वागत करताना सांगितले की, आमदार निलेश राणे यांनी विशेष पाठपुरावा करून या घाटाचे काम जलदगतीने पूर्ण करून घेतले. विसर्जनादरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा पथक तैनात केले जाणार असून, मोठ्या व वजनी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष ट्रॉलीची सोय करण्यात येणार आहे. या प्रसंगी त्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले.
मागील १० वर्षे विकासाची पाटी कोरीच होती. आमदार निलेश राणे यांनी आपल्या २ वर्षांच्या कार्यकाळात रस्ते, पाणी, वीज, शेतकरी आणि मच्छीमारांचे प्रश्न विधानसभेत अभ्यासपूर्ण रीतीने मांडून मार्गी लावले आहेत असे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल म्हणाले.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, माजी आमदारांनी १० वर्षांत विधानसभेत तोंडही उघडले नाही. त्यांच्या काळातील रखडलेली कामे स्वच्छ करण्याचे काम निलेश राणे करत आहेत. घोटगे-सोनवडे घाट, मालवण-देवबागसाठी १७२ कोटी आणि तोंडोळी-तळाशीळसाठी १४ कोटींचा निधी आमदार राणेंनी आणला आहे. अशा वैफल्यग्रस्त माजी आमदारांच्या विधानांवर पत्रकारांनी आपली लेखणी व वेळ वाया घालवू नये.










