LIVE UPDATES

कोणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही !

आदित्य ठाकरेंना केसरकरांचा इशारा
Edited by: विनायक गावंस
Published on: July 09, 2025 20:09 PM
views 105  views

सावंतवाडी : आदित्य ठाकरेंचा तो पोरकटपणा आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार आहे. दिवसरात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोकं आहेत. मी मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदारांकडून एक रुपया घेतल्याचा दाखवा असे आव्हान माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिले. तसेच माझी बांधीलकी माझ्या जिल्ह्याशी, माझ्या तत्वांशी आहे. मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही. अन् कोणी अंगावर आलं तर सोडत नाही. त्यामुळे विनाकारण भानगडीत पडू नका असा इशारा त्यांनी दिला. सावंतवाडीतील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरेंचा पोरकटपणा

श्री केसरकर म्हणाले, यापूर्वी फक्त मागास विद्यार्थांना सोडून इतरांना गणवेश दिला जात नव्हता. ते सर्व विद्यार्थ्यांना मी मंत्री असताना द्यायला लावले. पुस्तकांचा बोजा कमी केला, नवीन प्रयोग करताना काही त्रुटी राहू शकतात. चांगल्या दर्जाचा कपडा मुलांना दिला जात नव्हता.‌ माझ्या काळात ते दिल गेले. गणवेशाची आदर्श योजना होती. आदित्य ठाकरेंचा पोरकटपणा आहे असा टोला श्री. केसरकर यांनी लगावला.

...तर ठाकरे घराण्याचा कमीपणा झाला असता

मी उद्धव ठाकरे यांचा आजवर आदर केला. पण, ज्यावेळी मी बोलायला सुरुवात करेल तेव्हा तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. अशा फालतू घोषणांना तिथल्या तिथे उत्तर देऊ शकलो असतो. पण, ठाकरे घराण्याचा कमीपणा झाला असता. याबाबत मी वरिष्ठांशी चर्चा करणार होतो. ही एक चांगली योजना आहे. शिक्षण खात्यात मी चांगलं काम केलं. मराठीला न्याय दिला आहे. राज ठाकरे नेहमी मराठीसाठी भांडतात. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा ते चालवत आहेत.‌ पण यांनी काय केलं ? मुंबईतील मराठी शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याच काम केलं. त्यामुळे मराठीबद्दल बोलायचा यांना अधिकार नाही. माझा सारखं काम शिक्षणक्षेत्रात कोणी केलं असेल तर दाखवा, राजकीय जीवनातून दूर होतो. लोकांचा गैरसमज पायऱ्यांवर बसून केलेलं मी सहन करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मी मागितली आहे. त्यांनी मोकळीक दिली की मी बोलायला मोकळा आहे. मी कोणाला घाबरत नाही असा इशारा त्यांनी दिला. 

कोणी अंगावर आलं तर सोडत नाही

दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांच्या गाडीत सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हत. रहायला जागा देत नव्हत एवढा दरारा नारायण राणेंचा होता. बाळासाहेबांचा मुंबईत दारारा होता. पण, इथे गोव्यात जावं लागतं होत. जिल्ह्यात हे आले नाही, मी लढा दिला. पण, त्यांनी युझ ॲड थ्रो केलं. राणेंशी माझा वैयक्तिक वाद नव्हता. कार्यकर्ते चुकीचं वागत होते.‌ त्यामुळे ठाकरेंनी उगाच माझ्यावर बोलू नये. माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याशी, तत्वांशी आहे. मी स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही अन् कोणी आलं तर सोडत नाही असा इशारा दिला.