PM मोदींच्या हस्ते 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा'चे उद्घाटन !

सिंधुदुर्गातील 8 गावांचा समावेश
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 19, 2023 20:21 PM
views 232  views

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात 511 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' (PM-GKVK) निर्माण करण्यात येणार आहेत. या कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्यप्रणालीव्दारे (ऑनलाईन) करण्यात आला.


कुडाळ येथील आयडीयल स्कील सेंटर पिंगुळी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कापडणीस, तहसिलदार श्री पाठक, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री मोहारे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.पां. चिमणकर आदी उपस्थित होते. यावेळी आयटीआय तसेच महाविद्यालयीन विद्याथी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आशा वर्कर, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 8 ‍ठिकाणी उद्घाटन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी पडदा लावून (Digital Wall) ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याचा लाभ घेण्याची सोय करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद लाभला. विशेषत: युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याअंतर्गत जिल्हयात 8 ठिकाणी कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे. जिल्ह्यातील  शिरगांव, साठेली भेडशी, पिंगुळी, आचरा, शिरोडा, कोकीसरे, माजगांव, फोंडाघाट या ठिकाणी देखील जनतेसाठी कार्यक्रमाच्या थेट प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी प्रत्येक केंद्रांवर लोकप्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, कर्मचारी, गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.