कोल्हापूर : फूड इंडस्ट्रीजमध्ये राज्यभर परिचित असलेले चकाेते ग्रुप ऑफ इंडस्ट्री आता नव्या क्षितीजापलीकडे वाटचाल करीत आहे. नांदणी, काेल्हापूरसह राज्यभर अनेकांच्या हृदयात वसलेल्या चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या नव्या प्रकल्पाचे शानदार उद्घाटन शनिवारी (दि. २८) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. शनिवारी दुपारी १२.३० वाजता नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी फूड क्लस्टरमध्ये हा सोहळा होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, तर शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती चकोते ग्रुपचे चेअरमन अण्णासाहेब चकोते यांनी दिली.
चकोते ग्रुपचे चेअरमन अण्णासाहेब चकोते म्हणाले, गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर अनिवार्य असल्याचे मला जाणवले आणि या प्रकल्पाची बांधणी झाली. अतिशय प्रतिकूल अशा कोरोना काळातदेखील प्रत्येक टप्प्यावर विविध संकटांवर मात करत चकोते ग्रुपने या प्रकल्पाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. हा प्रकल्प नांदणी येथील स्वाभिमानी फूड पार्कमधील तेरा एकर जागेमध्ये आणि अडीच लाख चौरस फूट सुपर बिल्टअप एरियामध्ये आकारास आला आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणारा प्रत्येक पदार्थ गुणवत्तेचा नवा बेंचमार्क सेट करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास खा. धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, संजय पाटील, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आ. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, राजू आवळे, राजू शेट्टी, माजी आ. सुरेश हाळवणकर व एच. के. बत्रा यांसह आजी-माजी खासदार, आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कंपनीचा स्टाफ, कामगार व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यांतील सर्व वितरक, रिटेलर्स उपस्थित राहणार आहेत.