मला पक्षात घ्या, अशी याचना भविष्यात तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे कराल !

सतीश सावंत यांचा नितेश राणे यांना टोला | तुम्हाला भाजप तिकीट देईल का याचा विचार करा
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 13, 2023 18:33 PM
views 174  views

कणकवली : जे स्वत:चा स्वाभिमान पक्ष सात महिने जिवंत ठेऊ शकले नाहीत, त्यांनी शिवसेनेला जिवंत ठेवण्याची भाषा करू नये. भाजपाने तिकीट वाटपाचा अधिकार आमदार राणेंना दिलेला नाही. उलट त्यांनाच तिकीट मिळते का? ही शंका आहे. भाजपाची वरिष्ठ मंडळी तुम्हाला किती दिवस पक्षात जिवंत ठेवणार, याचे आत्मपरीक्षण करा.  मला पक्षात घ्या, म्हणून आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याचना करण्याची वेळ भविष्यात तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी लगावला आहे.


कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक निलम पालव, तालुका प्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, ॲड. हर्षद गावडे, प्रमोद मसुरकर, गोट्या कोळसुलकर, उत्तम लोके, वैद्येही गुडेकर, दिव्या साळगांवकर, माधवी दळवी, संजना कोलते व इतर उपस्थित होते.


उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हाप्रमुख सोडाच पण साधा शाखाप्रमुखही आमदार नितेश राणेंच्या संपर्कात येणार नाही. त्यामुळे त्यांनी दिवास्वप्ने पाहू नयेत, असे सांगताना सतीश सावंत म्हणाले, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत अकरा आमदार होते. आज काय स्थिती आहे. त्यावेळी निवडणूका आल्यावर आघाडी सत्ता येणार असल्याची चाहूल लागताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसची सत्ता जाणार हे समजताच भाजपात प्रवेश केला. भाजपाने आता तिकीट वाटपाचा अधिकार आमदार राणेंना दिलेला नाही. उलट त्यांनाच तिकीट मिळते का? ही शंका आहे. तेवढी भाजपाची व्युहरचना आहे. त्यामुळे भाजपा तुम्हाला पक्षात किती दिवस जिवंत ठेवणार आहे, याचे आत्मपरीक्षण करा. आम.नितेश राणे केवळ स्टंटबाजीशिवाय काहीच करत नाहीत. उलट आम. वैभव नाईक कुडाळ मालवण मतदारसंघात काम करत आहेत. राणेंनी निधीची केलेली घोषणा ही कागदावरची आहेत. जूनमध्ये समजेल किती कामे झाली आहेत. घाट रस्त्यासाठी साठी ४०० कोटीचा निधी आला असल्याचे सांगत आहेत, पण रस्त्याची स्थिती पहा काय आहे. ठेकेदार भेटायला यावेत, व कार्यकर्ते थांबावेत यासाठी 2 हजार कोटीचा निधी मंजूर केला असे सांगून धडपड चालू ठेवली आहे, असेही श्री. सावंत म्हणाले.

 गद्दारीनंतरही जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही खेडमधील जी सभा झाली, ती विरोधकांना धडकी भरविणारी होती. मात्र, जनता आमच्यासोबत असून आगामी निवडणुकीत मतदारच विरोधकांना चपराक देतील व सिंधुदुर्गातील तीनही आमदार व खासदार आमचेच असतील, असे सतीश सावंत म्हणाले.

कणकवली विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाप्रमुख म्हणून संधी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खास.संजय राऊत, भास्कर जाधव, वैभव नाईक, अरूण दुधवडकर, गौरीशंकर खोत यांना आपण धन्यवाद देतो. पक्षप्रमुखांना अपेक्षीत असलेले काम आपण या मतदारसंघात करणार असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने पक्षबांधणी करण्यात येणार आहे. तालुका व विभाग निहाय बैठका, आवश्यकतेनुसार वरिष्ठांशी चर्चा करून नविन नियुक्त्या, बुथ सक्षम करणे आदी कामे केली जातील. कोणत्याही स्थितीत पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्वांना विश्वासात घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असे सतीश सावंत म्हणाले.

खासदार विनायक राऊत हे १५ मार्च रोजी  ७० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्ताने जिल्हा शिवसेनेच्यावतीने ओरोस येथील शरद कृषी भवन येथे दु. ३ वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील ६९ ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.