आ देखे जरा किसमे कितना है दम | हिंमत असेल तर 48 तासांत मातोश्रीवर या !

‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना आव्हान
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 05, 2023 18:35 PM
views 436  views

ब्युरो न्युज : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरच गुन्हा दाखल केला नाही, यावरून उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभला, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं.


या विधानानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला. येथून पुढे देवेंद्र फडणवीसांवर अशा भाषेत टीका केल्यास उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडू देणार नाही, असं बावनकुळे म्हणाले. बावनकुळेंच्या या विधानाचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. हिंमत असेल तर पुढील ४८ तासांत मातोश्रीवर येऊन दाखवा, असं खुलं आव्हान सुषमा अंधारे यांनी दिलं. त्या ठाण्यात रोशनी शिंदे यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या मोर्चात बोलत होत्या.



यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंना आम्ही मातोश्रीबाहेर पडू देणार नाही, असं काल बावनकुळे म्हणाले. पण बावनकुळेसाहेब, तुम्ही ज्या आवेशात बोललात… याचा अर्थ महाराष्ट्र भाजपा तुमचं ऐकते. महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा वचक आहे. महाराष्ट्र भाजपात तुमचा दबदबा आहे. मग माझा चंद्रशेखरदादांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे, भाऊ जर तुमची इतकी ताकद, इतकी कुवत, इतकी क्षमता, इतकी ऐपत आणि इतकी हिंमत तुमच्यात आहे. तर मग त्याच फडणवीसांनी तुमचं तिकीट का कापलं?”


“बावनकुळेंना स्वत:ची उमेदवारी वाचवता आली नाही. तरीही त्यांचं म्हणणं असेल की, ते उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडू देणार नाहीत. आम्ही चांगलीच माणसं आहोत. आम्ही सज्जन आहोत. आमच्यावर आमच्या खानदानाने फार चांगले संस्कार केले आहेत. त्यामुळे बावनकुळेसाहेब, दोन हात आणि मस्तक जोडून मी आपल्याला आमंत्रण देते, हिंमत असेल तर ४८ तासांत मातोश्रीत या… आ देखे जरा किसमे कितना है दम…” अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी हल्लाबोल केला.