रिफायनरी प्रकल्पाच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न झाला तर 'एल्गार'

रिफायनरी समर्थकांचा कडक इशारा !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 07, 2022 17:35 PM
views 427  views

राजापूर :  रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधकांना तडीपारीच्या नोटिसा आल्यानंतर लोकशाही आठवली आहे, मात्र रिफायनरीच्या समर्थनार्थ आमच्या गावांत आल्यास त्यांचा योग्य तो समाचार घेतला जाईल, असे उघड बॅनर्स लावून धमकावणे, समर्थकांवर सामाजिक बहिष्कार टाकणे, दमदाटी करून त्यांना त्यांचे म्हणणे मांडू न देणे, देवळात नारळ ठेऊन लोकांना धार्मिक भीती घालून शपथा घ्यायला लावणे ही लोकशाही पाळणारी कृत्ये आहेत काय, असा सवाल राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या विविध समित्यांनी लेखी पध्दतीने केला आहे.


रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती राजापूर, धोपेश्वर - गोवळ- बारसू दशक्रोशी रिफायनरी समर्थन समिती, नाटे राजवाडी दशक्रोशी रिफायनरी समिती, फार्ड रत्नागिरी, ओम चैतन्य श्रीभानुदासाय स्त्री हितवर्धीनी चॅरिटेबल ट्रस्ट आदी समित्या व संस्थांनी हा सवाल उपस्थित केला असून विरोधकांच्या तडीपारीसंदर्भात शासनाने उचललेले पाऊल योग्य असल्याचे मत मांडले आहे.


रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणान्यांनी विरोधकांच्या दडपशाहीविरोधात कधीही गहजब माजवलेला नाही मात्र आपले समर्थनाचे कार्य जारी ठेवले. लोकांचे प्रबोधन हा एकमेव उपाय त्यांनी अंगिकारला आहे. मात्र दुसरी बाजू ऐकून घेऊ नये, यासाठी आजतगायत ग्रामस्थांवर दबाव आणणाऱ्या विरोधकांना लोकशाहीची चाड असल्याचे कधीही दिसून न आल्याची टिका करण्यात आली आहे. प्रकल्पाचे फायदे व माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचू न देण्याचे षडयंत्र मुंबईस्थित एनजीओनी पूर्वीपासूनच आखलेले आहे. मात्र तालुक्यात सूज्ञ असलेल्या जनतेने या एनजीओंना कधीही थारा दिलेला नाही. त्यामुळे हे एनजीओ राजापूर शहर वगळता ग्रामीण भागात जाऊन गैरसमज पसरवण्याचे उद्योग करीत आहेत. मात्र तरीही तेथेही असलेल्या सुशिक्षित वर्गाने प्रकल्पाची माहिती घेऊन आपले उघड समर्थन जाहीर केले आहे. देवाचेगोठणे आणि शिवणे खुर्द येथील जमीन प्रकल्पातून वगळण्यात आल्यानंतर त्याला अनुसरून धोपेश्वर, बारसू नाटे येथील सर्वच जमीन मालकांनी प्रकल्पाला आपली जमीन देऊ केली असून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, असे या समित्यांनी म्हटले आहे.

स्थानिक आमदारांसह विविध राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी देण्यात आला आहे. याठिकाणी प्रकल्पाला आपला पाठिंबा पूर्वीच जाहीर केलेला आहे. शिवाय राजापूर तालुक्यातील सुमारे १२५ गावांचे प्रकल्प समर्थनाचे ठराव शासनाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. राजापूरसह रत्नागिरी आणि लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ७५ विविध संघटनांनी प्रकल्पाला आपला पाठींबा घोषित केलेला आहे. त्यामुळे दोन-चार गावांतील काही वाड्यांच्या विरोधाचे तुणतुणे वाजविणाऱ्या विरोधकांनी त्या गावांतील जमीन मालकांनी प्रकल्पाला आपल्या जमीनी देण्याची लेखी तयारी दर्शवलेली आहे हे विसरू नये, असेही या समित्यांनी स्पष्ट केले आहे. समर्थकांनी कधीही आपले म्हणणे मांडताना धमकीवजा पोस्टर्स, बॅनर्स, याचा वापर केलेला नाही. खोटी माहिती असलेली पत्रके वाटणे, बहिष्काराच्या धमक्या देणे, नारळावर हात ठेऊन शपथा घ्यायला लावणे असे गैरप्रकार केलेले नाहीत. मात्र विरोधकांनी असे गैरप्रकार केल्याच्या केवळ नोंदीच नसून तशा तक्रारी देखील झालेल्या आहेत, त्यामुळे शासनाने घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे असा निर्वाळा या पत्रकात देण्यात आला आहे. दोन-चार विरोधक संघटना एकत्र करून जर यापुढे राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पाच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न झाला तर जागरूक रिफायनरी समर्थक समित्या एकत्र येऊन भविष्यात मोठ्या प्रमाणात एल्गार करण्याचे योजित आहेत, असा इशाराही देण्यात आला आहे.