स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील पोलिसांचा गौरव | 84 राष्ट्रीय पदके जाहीर

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 15, 2022 12:46 PM
views 264  views

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील १०८२ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. त्यात महाराष्ट्रातील पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी ३ राष्ट्रपती पदके, ४२ शौर्य पदके व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पदकांचा बहुमान मिळाला.

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना सर्वाधिक १२५ पोलीस पदके व त्यानंतर महाराष्ट्राला ८४ पोलीस पदके जाहीर झाली. निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफला १७१ व त्यानंतर बीएसएफला ७० पोलीस पदके मिळाली आहेत. जम्मू-काश्मीरने सर्वाधिक पोलीस पदके मिळविली असून, त्यात १०८ शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेसाठी २ राष्ट्रपती पदके, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी १५ पदकांचा समावेश आहे. सीबीआयला ३० पोलीस पदकांचा बहुमान मिळाला आहे.

एकूण पोलीस पदकांमध्ये ३४७ शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेसाठी ८७ राष्ट्रपती पदके व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६४८ पोलीस पदकांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. निमलष्करी दलांमध्ये सर्वात जास्त १०९ शौर्य पदके सीआरपीएफला मिळाली. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)ला १९, तर इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) व सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांना प्रत्येकी ६ शौर्य पदके मिळाली.

महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदके मिळाली. त्यात सुनील कोल्हे (सहआयुक्त, राज्य गुप्तचर विभाग, कुलाबा), प्रदीप कन्नलू (सहायक आयुक्त, वायरलेस विभाग, ठाणे), मनोहर धनावडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ओशिवरा पोलीस ठाणे, मुंबई) यांचा समावेश आहे.

हरयाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रीकांत जाधव (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले. तेलंगणातील अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी महेश भागवत (हैदराबाद परिक्षेत्रातील रचाकोंडाचे पोलीस आयुक्त) यांनाही हेच पदक जाहीर झाले आहे.