बिल्डरनं सुपारी दिल्यासह १ कोटीची खंडणी मागितल्याचा गुरव यांचा आरोप

Edited by: ब्युरो
Published on: February 09, 2023 18:04 PM
views 146  views

सावंतवाडी : धक्कादायक बातमी समोर येतेय सावंतवाडीतून. शांत असलेल्या सावंतवाडीत दहशत माजवण्याच काम काहींकडून सुरु आहे. एका बिल्डरनं दादागिरी करत थेट घराबाहेर काढण्यासाठी गुंड पाठवून मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. हे प्रकरण इथवरच न थांबता बिल्डरने पाठवलेल्या गुंडाकरवी तब्बल 1 कोटीची खंडणी मागण्यापर्यंत मजल गेलीय. हा प्रकार घडलाय सावंतवाडी तालुक्यातील विघ्नहर्ता, शनिमंदीर ट्रस्ट बिल्डींग सालईवाडा इथं राहणाऱ्या विनायक केशव गुरव यांच्यासोबत. त्यामुळे बिल्डर आणि मारहाण - खंडणी मागणाऱ्या दोघांना तात्काळ अटक करावी, अशी तक्रार विनायक गुरव यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलीय.


विनायक गुरव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, मी ही इमारत रामदास शंकर डोईफोडे, रा. पनवेल या बिल्डर कडून सन 2010 सालात अर्धवट कन्स्ट्रक्शन असलेली इमारत विकत घेतली होती. तेंव्हा पासून आजरोजी पर्यंत या बिल्डींगचा ताबा माझ्याकडेच आहे. या बिल्डरला लाखो रुपये देऊनही आजपर्यंत रजिस्टर साठेकरार अथवा खरेदीखत करण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गेल्या 13 वर्षात त्याने मला हे घर खाली करण्यासाठी अनेक वेळा त्रास दिला. शनिवार 4 फेब्रुवारीला सकाळी 11.00 च्या दरम्यान बिल्डरच्या एका माणसाने मला 3-4 वेळा कॉल केला. त्याच्या सुमारे 3 ते 4 दिवस आधी बिल्डर डोईफोडे यांनीही मला 3-4 वेळा कॉल केला होता. परंतु मी त्याचा फोन उचलला नाही. कारण सावंतवाडी कोर्टामध्ये त्याच्या विरोधात केस नं. 1).0.5./6/2021 चा दावा चालू आहे. त्यानंतर बिल्डरच्या माणसाने त्याचे नांव अमित परब, त्याने मला हॉटेल मॅन्गो-2 कडे बोलावून घेतले. त्यानंतर त्याने मला माझ्या ताब्यात असलेली इमारत बिल्डर डोईफोडेने त्याला विकली, असे सांगितले. 


घराबाहेर काढण्याची धमकी !

या लोकांची दहशत सुरूच होती.  मला ही इमारत तुम्ही खाली करायची मी ऐकून घेणार नाही. एक हजार लोक आणून तुम्हाला घराबाहेर काढून मी या इमारतीचा ताबा घेणार असे सांगितले. नाहीतर तुम्ही 11 लाख रुपये घ्या व निमूटपणे खाली करा. असे दमटावणीच्या सुरात सांगितले. त्यानंतर त्याने नाहीतर मला तुम्ही 1 कोटी रुपये द्या, नाहीतर तुम्हाला सर्वांना घराबाहेर हाकलून देणार, असे दादागिरीच्या भाषेत  सांगितले. त्या शिवाय माझ्या जवळ तुम्हाला घर खाली करण्याची कोर्टाची ऑर्डर आहे. मी पोलीसांना आणून पण घर खाली करु शकतो व तुमचे सामान बाहेर फेकू शकतो. तुम्ही माझे काहीच वाकडे करु शकत नाही, अशी धमकी दिली.  


जीवास धोका असल्याचा दावा


मी ऑर्डर दाखव असे सांगितले असता, त्याने टाळाटाळ केली. त्याचा अर्थ बिल्डर रामदास शंकरराव डोईफोडे याने सुपारी घेऊन घर खाली करणारा तसेच माझ्या जवळ 1 कोटी रुपयांची खंडणी मागणारा, बिल्डरचा हस्तक अमित परब या दोघांना तात्काळ अटक व्हावी. कारण त्यांचे पासून माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. भविष्यात मला व माझ्या कुटुंबियांना काही झाले तर या दोघांना जबाबदार धरण्यात यावे, अस विनायक गुरव यांनी तक्रारीत म्हटलंय. 


या संदर्भातलं निवेदन त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जिल्हा पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांनाही देत कारवाईची मागणी केलीय. पैशांच्या जोरावर अशा प्रकारे दादागिरी करणाऱ्या या बिल्डरवर पोलीस काय अॅक्शन घेतात हे पाहावं लागले.

तक्रारीबद्दल कल्पना नाही : अमित परब 

याबाबत तक्रारीत नमुद असलेल्या अमित परब यांच्या मोबाईल नंबरवर आम्ही संपर्क साधला असता ते म्हणाले, विनायक गुरव हे माझे मित्र आहेत. आमचे चांगले घरगुती संबंध आहे. अशी तक्रार का दिली हे कळू शकलं नाही, त्यांच्याशी याबद्दल आधी बोलावं लागेल. त्याशिवाय यावर प्रतिक्रिया देता येणार नाही. कारण, मुळात खंडणी किंवा असा माझा व्यवसाय नाही. सावंतवाडीत बरीच वर्ष सामाजिक काम करतो, उलट मदतीचा हात आम्ही करतो. गुरव यांनी ही तक्रार का दिली हे आधी पहावं लागेल. नेमका काय विषय हे जाणून घ्यावं लागेल. १ कोटीची खंडणी, कुठला बिल्डर हा विषय मला समजल्यानंतर यावर अधिक प्रतिक्रिया देता येईल. गुरव आणि आमचे चांगले संबंध असल्यान वारंवार भेटण बोलण होत. चार-पाच दिवसांपूर्वी गुरव आणि माझी भेट देखील झाली. मुळात हा विषय मला माहित करून घ्यावा लागेल. आज तुमच्या माध्यमातून पहिल्यांदाच हा विषय माझा कानावर आला आहे. त्यामुळे पोलिसांकडून नेमका विषय काय आहे हे जाणून घेऊन या विषयावर प्रतिक्रिया देता येईल अशी प्रतिक्रिया अमित परब यांनी दिली आहे.