रोहा : खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून न्यायालयाने सरकारचे कान उपटले असतानाच आता अलिबाग रोहा हा राज्यमार्ग लटकल्याचे समोर आले आहे. १७७ कोटींच्या या कामाचे अँडव्हान्स म्हणून घेतलेले १८ कोटी रुपये घेऊन गुजरातचा ठेकेदार फरार झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने जेआरए रस्ता प्रकल्प या कंत्राटदार कंपनीला वारंवार नोटिसा बजावल्या. मात्र त्याला केराची टोपली दाखवत ठेकेदाराने कलटी मारली आहे. त्यामुळे ठेका मंजूर होऊन वर्ष झाले तरी या मार्गाचे काम रखडले आहे.
राज्य महामार्ग असलेल्या अलिबाग रोहा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्याच्या कामासाठी १४ महिन्यांपूर्वी ठेकेदार नेमण्यात आला होता. यासाठी १७७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. हॅम (हायब्रीड ॲन्युटी मॉडल) अंतर्गत मंजूर झालेल्या अलिबाग-रोहा रस्त्याचे काम गुजरातमधील ''मेसर्स जेआरए रस्ता प्रकल्प प्रा. लि.'' या ठेकेदार एजन्सीला देण्यात आले. या ठेकेदाराने रस्त्यावरील नांगरवाडीजवळ डांबर बॅचमिक्स प्लांट व रेडीमिक्स सिमेंट काँक्रीट प्लांट उभारल्याचा देखावा केला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ॲडव्हान्स म्हणून १८ कोटी रुपये हडपले परंतु एक वर्ष उलटून गेले तरी रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. ॲडव्हान्स घेतल्यापासून कंत्राटदार नॉट रिचेबल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने एजन्सीला नोटीस बजावली आहे, परंतु ठेकेदाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने एजन्सीचा करार संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये संताप
या कामाअंतर्गत अलिबाग- रोहा -साई हा ८५ किलोमीटरचा दुपदरी मार्ग करण्यात येणार आहे. म्हसळा तालुक्यातील साईपर्यंत हा मार्ग उभारण्यात येणार आहे. त्याची पुढे कनेक्टिव्हीटी दिघी पोर्टपर्यंत असणार आहे.
औद्योगिकीकरणाला चालना देणाऱ्या या मार्गावरील सानेगाव, फाटा (निडी), डोंगरी, करंजवीरा ते रामराज या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निधी उपलब्ध असूनही रस्त्याचे काम रखडल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.