कागल : आडी येथील हार्दायन, श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने वंदूर (ता. कागल) येथे नूतन संस्थापित परमात्मराज अधिष्ठान, वंदूर या ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेल्या हॉस्पिटल इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे काम पूर्णत्वास गेले. यावेळी परमपूज्य परमात्मराज महाराज, श्री देवीदास महाराज व आश्रमस्थ साधू आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी परमपूज्य परमात्माराज महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून व काँक्रीटची पाटी ओतून स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. एकूण चौदा हजार स्क्वेअर फूटाचा स्लॅब हा कमी कालावधीत पूर्ण झाला. स्लॅब टाकण्याची संपूर्ण यंत्रणा अत्यंत चांगली व पुरेशी असल्यामुळे एवढा मोठा स्लॅबही लवकर पूर्ण करणे शक्य झाले.
ट्रस्टच्या वतीने वंदूर येथे एक मल्टिस्पेशालिटी चिकित्सालय निर्माण होत आहे. याठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या द्वारे ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक उपचार, आयुर्वेदिक पंचकर्म व अन्य आयुर्वेदिक उपचार गरजूंना मिळावेत. या मनोदयातून परमपूज्य परमात्मराज महाराजांनी हॉस्पिटल निर्माण कार्य हाती घेतले आणि अल्पावधीत पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे काम पूर्णत्वास आले. भाविकांच्या उस्फुर्त अर्थसाह्यातून आणि श्रमदानातून निर्माण होत असलेले अल्पावधीतील हॉस्पिटल इमारतीचे काम पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आडी, बेनाडी, हणबरवाडी, वंदूर, सुळगाव, मत्तिवडे, शेंडूर, म्हाकवे, बेलवळे, सुळकुड, सौंदलगा, जैनवाडी, मांगुर, हुपरी, हेरवाड, हंचिनाळ, कोडणी, कागल, कोल्हापूर इत्यादी गावच्या असंख्य भाविकांनी श्रमदान केले. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.