LIVE UPDATES

साहित्यिक प्रा रमेश कोटस्थाने यांना देवाज्ञा

Edited by: विनायक गांवस
Published on: July 02, 2025 12:13 PM
views 132  views

पुणे : प्रा. रमेश कोटस्थाने यांचे १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांच्या पुणे येथील राहत्या घरी देहावसान झाले.

प्रा. रमेश कोटस्थाने हे मराठी साहित्यातले एक दिग्गज लेखक, नाटककार व एकांकिकाकार होते. सन १९८० च्या दशकात त्यांचे " घरात हसरे तारे " हे विनोदी नाटक किशोर प्रधान व शोभा प्रधान यांनी मराठी रंगभूमीवर गाजवले होते. त्याच दशकात त्यांच्या अनेक एकांकिका कॉलेज स्पर्धांमध्ये गाजल्या व अनेक प्रतिष्ठित पुरस्कार विजेत्या ठरल्या होत्या. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. तसेच ह्या भाषांचे ते अभ्यासक होते.

त्यांनी कथा, रहस्य कथा, कविता, कादंबरी, नाटक, एकांकिका, चित्रपटकथा लेखन व संवाद लेखन, ललित, लेख, बाल साहित्य, श्रुतिका व समीक्षा या सर्व माध्यमातून समर्थपणे साहित्य लेखन केले होते. त्यांची आजवर ह्या विविध साहित्य प्रकारात अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. 

ते वाणिज्य व्यवस्थापन विषयाचे रा. आ. पोदार वाणिज्य महाविद्यालय, माटुंगा, मुंबई येथे व्याख्याते होते.

 वंदना प्रकाशन मुंबई संस्थेतर्फे मागील पंचवीस वर्षे मराठी, हिंदी, इंग्रजी छापील पुस्तके व मराठी ई बुक पुस्तकांकरिता उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी आशीर्वाद पुरस्कार प्रदान केले जातात, त्या पुरस्कार निवड समितीचे ते मागील तेवीस वर्षे अध्यक्ष होते. नवोदित ते आघाडीच्या साहित्यिकांना प्रेरित करण्याचे हे कार्य ते कोणतेही मानधन न घेता करत होते. असे साहित्यिक दुर्मिळ आहेत.