मुंबई : घावनळे गाव संघ, मुंबई आणि ग्रामस्थ सहाय्यक मंडळ (रजि.) या मंडळांच्या वतीने कै. चंद्रकांत गजानन म्हाडेश्वर यांच्या स्मरणार्थ 'गजर हरिनामाचा - जागर दशावताराचा' हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
घावनळे गाव आणि मुंबईतील चाकरमानी यांना एकत्र आणून विचारांची देवाण-घेवाण आणि गावाच्या विकासात्मक कामांसाठी चालना तसेच गावातील दशावतार कलाकारांना व भजन मंडळांना, मुंबईतील स्थानिक भजनी कलावंत यांना एकत्रित करून, त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण व सत्कार व्हावा, यासाठी मोठे व्यासपीठ मिळावे, हा मंडळाचा मूळ हेतू, उद्देश होता.
अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मंडळाचे हे दुसरे वर्ष आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिने चित्रपट, निर्माते व दिग्दर्शक, तुळसुली गावचे सुपुत्र अभिजित वारंग, तसेच सिनेअभिनेते मंगेश देसाई, भजन सम्राट गुरूवर्य भगवान लोकरे बुवा, गुरूवर्य प्रमोद धुरी बुवा, प्रकाशजी चिले बुवा, कुडतरकर बुवा यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.
सकाळी श्री सत्यनारायण महापूजेने, आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भजन सम्राट भगवान लोकरे बुवा यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
लोकरे बुवा, प्रमोद धुरी बुवा यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. तसेच सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना गावीच राहून उधोगधंदे कसे करता येतील? आरोग्य यंत्रणा कशी राबविण्यात येतील? तसेच तेथील जनतेचे आरोग्य चांगले कसे राहील? अशा अनेक गोष्टींकडे लक्ष वेधले. मंगेश देसाई यांनी दशवतार म्हणजे काय? तसेच ही कला कशी निर्माण झाली? याचे विश्लेषण केले. तसेच उपस्थित मंडळीत जाऊन सेल्फी काढून कोकणातील जनतेची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी आठ भजन मंडळे व बुवा हे गावाहून उपस्थित होते. तसेच महिला भजन मंडळही आमंत्रित होते. स्थानिक मुंबईकर भजनी बुवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ दिवा (पूर्व) संचालक किशोर कर्पे आणि भजन मंडळी या मंडळाचे प्रशांत बिले बुवा यांच्या सुस्वर भजनाने गजर हरिनामाचा या कार्यक्रमाला सुरूवात झाली. पोवाडा, भारूड, कव्वाली, अल्लाद, पाळणे अशा प्रकारे भजनात सादरीकरण करण्यात आले.
तब्बल पंधरा तास चाललेल्या या कार्यक्रमात 'अश्रूंची झाली फुले' अर्थात 'वैष्णव उध्दार!' हा दशावतार नाट्यप्रयोग सादर झाला.
गावातील दशावतार कलावंत व भजन मंडळांना व बुवा यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मंडळांच्या वतीने प्रणिल नार्वेकर यांनी पूर्ण कार्यमाचे सूत्रसंचालन केले. मंडळाचे संस्थापक उमेश सावंत तसेच मंडळाचे अध्यक्ष नामदेव घाडीगांवकर यांनी गावावरून आलेल्या सर्व भजन, दशावतार कलाकारांचे तसेच चाकरमानी मंडळींचे, सर्वच उपस्थित मान्यवरांचे, श्रोत्यांचे,पदाधिकारी सभासद या सर्वांचे आभार मानले.