राज्याला विकसनशील बनविण्यात भाईंचा मोलाचा वाटा !

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांचे प्रतिपादन
Edited by: विनायक गांवस
Published on: February 04, 2025 13:13 PM
views 275  views

१०१ व्या जयंतीनिमित्त 'स्मरणिका प्रकाशन'

 सावंतवाडी : कोकणला उगाच सुवर्णभूमी म्हणत नाहीत. भाईसाहेब सावंतांप्रमाणे सोन्यासारखी माणसं या भूमीत होऊन गेली. आजचा दरळवणारा सुगंध हा त्यांनी स्वतःला चंदनाप्रमाणे झिजून घेतलेल्या मेहनतीमुळे आहे. महाराष्ट्राला विकसनशील करण्यासाठीचा पाया घालण्यात भाईसाहेबांचा मोलाचा वाटा होता. हिमालयाची उंची त्यांनी गाठली होती असे उद्गार माजी केंद्रीय मंत्री, रमाकांत खलप यांनी काढले. सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्यावतीने लोकनेते नामदार स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. ईशस्तवन,  स्वागतगीतानं कार्यक्रमास प्रारंभ झाला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिका प्रकाशन प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अँड रमाकांत खलप, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, माजीमंत्री आमदार सतेज पाटील, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार वैभव नाईक, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, संजय पडते,शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव माजी प्राचार्य व्ही बी नाईक, खजिनदार सी.एल. नाईक, अमोल सावंत, प्रा. प्रवीण बांदेकर आदी उपस्थित होते. 

माजी मंत्री श्री.खलप पुढे म्हणाले, भाईसाहेब सावंत यांना जवळून पाहिलेला मी एक आहे.  गोवा मुक्ती लढ्यात भाईंच सहकार्य गोमंतकीयांना मिळालं. आयुष्यात हिमालयाची उंची त्यांनी गाठली होती. या कोकणानं त्यांच्यासारखे नेते राज्याला दिले. त्यामुळे या कोकणची सर कॅलिफोर्नियालाही नाही. त्यांच्या स्मृतींना कितीही प्रणाम केले तरी ते पुरेसे नाही. श्वास असेपर्यंत त्यांचं स्मरण होतं राहील. त्यांच्यातील साधेपणा कधीही न विसरता येणारा आहे असे उद्गार अध्यक्षीय मनोगतात त्यांनी काढले.

मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, पुतळा हा व्यक्तीचा नसतो तर त्यांच्या कार्याचा असतो. आज भाईसाहेब सावंत यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. प्रेरणास्थान म्हणून या स्थळाकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राला विकसनशील राज्य बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ५० वर्षांपूर्वी पुढच्या ५० वर्षांचा विचार या लोकांनी करून ठेवला. त्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनी स्थापन केली. विकास, समृद्धीचा पाया त्यांनी घातला. अकरा खात्यांच मंत्रीपद त्यांच्याकडे होत. त्यांचा आदर्श घेऊन भविष्याची दिशा ठरवणं आवश्यक आहे. नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, एकाचवेळी राजकारण अन् सहकार याची मोट त्यांनी बांधली होती. आमचं घरोब्याचे स्नेह होते. सर्वांचं प्रेम भाईंनी मिळवल होतं. मंत्री म्हणून आमच्या भागाच नेतृत्व त्यांनी केलं. त्यांनी गावोगावी उभी केलेली आरोग्यसेवा ही जिल्ह्यासाठी मोठी देणं आहे. अनेक शैक्षणिक, वैद्यकीय संस्था त्यांनी उभ्या केल्यात. भाई हे एक संवेदनशील व्यक्तीमत्व ते होते असे मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.


दरम्यान, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आदींनी मनोगत व्यक्त करत जयंती निमित्त अभिवादन केले. या कार्यक्रमाच औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते शिल्पकार अमेय गुडीगार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भगवना देसाई, कुसुम बिल्ये, अण्णा केसरकर, अँड. दिलीप नार्वेकर, अँड. शामराव सावंत आदींचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल सावंत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मिलींद कासार तर आभार उप प्राचार्य डॉ सुमेधा नाईक धुरी यांनी मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत,  रामदासशेठ निळख, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, गुरूनाथ पेडणेकर, अँड. नुकल पार्सेकर, आत्माराम गांवकर, जगदीश धोंड, संप्रवी कशाळीकर, सुगंधा साटम, गुलाबराव चव्हाण, नागेश मोर्ये, मानसिंग पाटील, बयाजी शेळके, झाकीर हुर्ले, प्रसाद बांदेकर आदींसह शिक्षण प्रसारक मंडळ, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.