
चिपळूण : मध्यरेल्वे प्रशासनाने दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर चिपळूणसाठी स्वतंत्र रेल्वे मिळाल्यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कोकण रेल्वेमार्गावर चिपळूण आणि रत्नागिरीसाठी स्वतंत्र रेल्वे सोडण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. कोरोनाच्या काळात बंद झालेली दादर-दिवा पॅसेंजर पुन्हा सुरू करावी, अशी मागणीही होती. रेल्वे प्रशासनाने १५ ऑगस्टपासून गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन मेमू रेल्वे सुरू केली होती आणि ती दिवाळीपर्यंत राखण्यात आली होती. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मध्यरेल्वेने ही रेल्वा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
दिवा ते चिपळूण आणि चिपळूण ते दिवा दोन मेमू लोकल उपलब्ध राहणार आहेत. एक मेमू लोकल सकाळी ७.१५ वाजता दिवा रेल्वेस्थानकातून चिपळूणसाठी धावेल, तर दुसरी मेमू लोकल दुपारी १२ वाजता चिपळूण रेल्वेस्थानकातून दिवासाठी रवाना होईल. दोन्ही गाड्या सहा ते सात तासात निश्चित ठिकाणी पोहोचतील. त्यामुळे एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांवरील ताण कमी होणार आहे. या रेल्वेचे तिकीट ₹१०० पर्यंत आहे.
चिपळूण, खेड, रोहा, माणगाव, गोरेगाव, वीर, कोलाड, इंदापूर, पेण, पनवेल अशा २६ स्थानकांवर ही रेल्वा थांबणार आहे. कोकण रेल्वेमार्गावर दररोज २४ तासात २६ प्रवासी एक्स्प्रेस गाड्या धावतात. या गाड्यांपैकी ज्या गाड्यांना चिपळूण रेल्वेस्थानकावर थांबा आहे, त्यांना एक किंवा दोन जनरल डबे जोडलेले असतात. हे डबे रत्नागिरी, गोवा, कर्नाटक आणि केरळ येथून भरून येतात, ज्यामुळे चिपळूणपासून पुढच्या प्रवाशांना उभे राहावे लागते. अनेकदा आरक्षित डब्यांत अतिक्रमण करावे लागते.
दापोली, मंडणगड, गुहागर तालुक्याला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. संगमेश्वर व खेड येथे रेल्वेस्थानक असूनही एक्स्प्रेस गाड्यांना येथे थांबे नाहीत. त्यामुळे येथील प्रवासी चिपळूणला येऊन प्रवास करतात. खेड तालुक्यातील १५ गावांचा परिसर, चिपळूणच्या पूर्व विभागातील तसेच सावर्डे परिसरातील लोकसुद्धा रेल्वेने प्रवास करण्यासाठी चिपळूणला येतात. अशा सामान्य प्रवाशांसाठी मेमू रेल्वे उपयुक्त ठरणार आहे.













