
वेंगुर्ला: प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी आज वेंगुर्ला तालुक्यातील रेडी – कनयाळ येथील श्री नवदुर्गा मंदिरात सहकुटुंब भेट देऊन देवीची मनोभावे पूजा केली. यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसादाचाही त्यांनी लाभ घेतला.
रेडी कनयाळ येथील नवदुर्गा माता हे गावस्कर कुटुंबियांचे ग्रामदैवत आहे. या ग्रामदेवतेप्रती असलेल्या श्रद्धेतून सुनील गावस्कर यांनी मंदिराला लागून स्वखर्चातून अन्नछत्राचे बांधकाम केले आहे. आज गावस्कर यांच्या हस्ते या नवनिर्मित अन्नछत्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना सुनील गावस्कर यांनी सांगितले की, "जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो, तेव्हा आपण आवर्जून आपल्या या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी येतो आणि नतमस्तक होतो." गावस्कर आणि विश्वनाथ या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी एकत्र ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्याने परिसरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.











