
मुंबई : महाराष्ट्राने सागरी विकास क्षेत्रात देशाच्या इतिहासात नवा अध्याय रचला आहे. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अबू धाबी पोर्ट्स ग्रुपसोबत महाराष्ट्र सरकारने आज ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) केला असून, महाराष्ट्र हे अबू धाबी पोर्ट्सशी करार करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
या करारानुसार तब्बल २ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹१६,५०० कोटी) इतकी गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. जहाजबांधणी (Ship Building), शिप ब्रेकिंग, वॉटर ट्रान्सपोर्ट, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मरीन स्पोर्ट्स मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे.
या करारामुळे महाराष्ट्राच्या सागरी विकासाला मोठी चालना मिळणार असून, रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संधींना नवीन दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक करारामागे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असून, त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र सागरी विकासासाठी जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र राज्य देशाच्या सागरी नकाशावर एक अग्रगण्य आणि महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून उदयास येईल, असा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय.













