
कुडाळ: निवडणूका हा विषय फॅमिली स्तरावरचा नसतो तर पक्षीय स्तरावरचा असतो. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच स्वतंत्र निवडणूका लढताहेत. आम्ही दोघेच बंधू लढतोय का, नाही ना. त्यामुळे कोणाविरुद्ध कोण नाहीय. प्रत्येक जण आपापल्या पक्षासाठी झटत आहे. मी विरूद्ध कोण असं कुठेच नाहीय. आमची शर्यत कोणाशीच नाही. फक्त सिंधुदुर्ग जिंकला पाहीजे. शिवसेना कोणाच्या विरोधात ही निवडणूक लढवित नाहीय तर जिल्हा परिषद दर्जेदार देण्यासाठी उतरलो आहोत कोणाच्या विरोधात नाही, असे आ.राणे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. तसेच २७ वर्षे खासदार नारायण राणे यांनी जि.पं.वर झेंडा फडकविला. उद्याही त्यांच्याच विचारांचा जि.प.अध्यक्ष बसेल, असे आ.राणे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.ठाकरे शिवसेनेच्या मुख पत्रातून करण्यात आलेल्या अॅनाकोंडा वरील टिकेला उत्तर देताना आ.राणे म्हणाले की, कोणाबद्दल कशी भाषा वापरावी हे या वयात तरी उद्धव ठाकरेंना कळलं पाहीजे. आम्ही त्यांना करोना म्हटल तर चालेल का?. मुंबईला लागलेला करोनाच आहेत उध्दव ठाकरे. मुंबईची वाट लावली, आता ते अदानींच्या नावाने बोंब मारताहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांची निगेटिव्ह मानसिकता झाली आहे. एका माजी मुख्यमंत्र्याला ते शोभत नाही. त्यांनी पॉझिटिव्ह रहावं, चांगल काहीतरी महाराष्ट्रासाठी करावं. चांगल वाटेल पण नको ते शब्द वापरणं बरोबर नाही, अशी टिका आ.राणे यांनी केली.
आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो. पण आता युती होईल अस वाटत नाही. म्हणून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून स्वबळावर पूर्ण ताकदीने लढू. आमचं नियोजन आणि तयारी आहे. कुठेही आम्ही कमी पडणार नाही. जि.पं.च्या पन्नाही जागांवर आम्ही लढू शकतो आणि जिंकूही शकतो. जिंकण्यासाठीच निवडणूका लढवायच्या असतात. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायती, नगरपरिषदा शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणारही, असे राणे म्हणाले.











