सिंधुदुर्गनगरी : महामार्गाच्या कामामध्ये जर कोणी मुद्दाम अडथळे आणत असतील आणि त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे अपघात होत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर थेट गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.
महामार्गाच्या कामाविषयी आज कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, राजन तेली, अतुल काळसेकर, दत्ता सामंत, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधिक्षक अभियंता सुष्मा गायकवाड, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरीच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक, कणकवलीचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
खारेपाटण येथून जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर तसेच महामार्गाच्या कामातील अडचणी जाणून घेतल्यानंतर कुडाळ एमआयडीसी येथे या कामाविषयी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी चव्हाण यांनी नांदगाव, वागदे, वेताळ बांबर्डे, कुडाळ, झाराप येथील रखडलेल्या कामाचा आढावा घेतला.
महामार्गावर अपघातामध्ये लोक दगावत आहेत आणि त्यासाठी रखडलेली कामे कारणीभूत ठरत असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, ही रखडलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तसेच प्रांताधिकारी यांनी कार्यवाही करावी. नांदगाव येथील मोबदल्याचा प्रश्न तातडीने सोडवून सदरची जमीन राष्ट्रीय महमार्ग विभागास द्यावी. वागदे येथील कामही तातडीने पूर्ण करावे. वेताळ बाबंर्डे येथील पुलाजवळील काम मार्गी लावावे. वेताळ बांबर्डे येथील मुस्लिमवाडी येथे मोरीचा प्रश्न आहे. सदर मोरी दुरुस्त करण्याचे काम तातडीने करावे. कसाल हायस्कूल येथे मुलांना रस्ता ओलांडण्याची समस्या आहे. त्यासाठी तेथे फुट ओव्हर ब्रीज उभा करण्यात यावा. तसेच महामार्गाच्या कामामुळे मुलांना शाळेत जाताना अडचणी येतात. त्यासाठी तिथे मुलांना सुरक्षित रित्या शाळेमध्ये जाता येईल असे पहावे. ही सर्व कामे तातडीने हाती घेण्यात यावी. कुडाळ येथे आरएसएन हॉटेल जवळ ब्लिंकर्स, रम्बलर्स व रिफ्लेक्टर्स तातडीने लावण्यात यावेत. तसेच येथे बॉक्सवेल उभारण्याचा प्रस्तावही तयार करावा. जिल्ह्यात ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग ब्रीजची आवश्यकता आहे अशा सर्व ठिकाणांचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
महामार्गावर अपघात होऊन एखाद्याचा जीव जाणे ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगून मंत्री चव्हाण म्हणाले, अशा घटना थांबवण्यासाठी काम करणे जास्त गरजेचे आहे. आपण हे राष्ट्रीय काम करत आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संवेदनशील व लवचिक राहून लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या समस्यांमुळे काम रखडणे चुकीचे आहे. या सर्व समस्या सर्व संबंधित विभागांनी एकत्र चर्चा करून सोडवल्या पाहिजेत. वागदे येथे धोकादायक वळण आहे. त्याची माहिती वाहन चालकांना व्हावी यासाठी तिथे चिन्हे, वेग मर्यादा तसेच रिफ्लेक्टर्स बसवावेत, असेही ते म्हणाले.