कणकवली : कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्यावरील एसीबी कारवाईच्या विरोधाल एसीबी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. सदर मोर्चाच्या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, व आमदार नितेश राणे यांच्यासह भाजप नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरून तेढ निर्माण करून करणारी चिथावणीखोर वक्तव्य शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली. तसेच जिल्हयात शांतता बिघडवण्याचे काम बाहेरील जिल्हयातील लोकांनी येऊन केले. या घृणास्पद प्रकाराने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय संतापाची लाट निर्माण झाली असून, आपण संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तरी या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता जाणून आमदार भास्कर जाधव यांच्या गुन्हा दाखल करावा. अन्यथा येथून उठणार नाही, असा इशारा कणकवली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा कणकवली पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे दिला.
त्यानुसार याबाबत वरिष्ठांशी चर्चा झाली असून, कुडाळ येथे या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिल्याचे भाजपाकडून संगण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, माजी उपसभापती महेश गुरव, बंडू गांगण, समीर प्रभूगावकर, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, पंढरी वायगणकर, मेघा सावंत, प्रदीप ढवण, निखिल आचरेकर, जावेद शेख, सचिन पारधीये, श्री देसाई, इब्राहिम शेख, राजा पाटकर आदी उपस्थित होते.