मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विवेकी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात निर्घृणपणे खून करण्यात आला, या घटनेला २० ऑगस्ट रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. तरी अजूनही त्यांच्या खूनाच्या सूत्रधाराचा शोध लागत नाही व त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही. तसेच शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ये नंतर महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा पास झाला, त्यालाही दहा वर्ष होत आहेत; पण अद्यापही त्या कायद्याची नियमावली बनवली गेली नाही. याबाबत शासन उदासीन आहे असं अंनिसच्या निवदेनात म्हंटल आहे.
याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसच्या वतीने शनिवार, दिनांक १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत निर्भय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन दादर येथील वीर कोतवाल उद्यान येथे होईल. या आंदोलनात मुंबईतील व आजूबाजूच्या परिसरातील महाराष्ट्र अंनिसच्या सर्व शाखांचे कार्यकर्ते व समविचारी, परिवर्तनवादी संघटना आणि हितचिंतक व मानवतावादी नागरिक सहभागी होणार आहेत. हिंसाविरोधी मानवतावादी विचारसरणी असणाऱ्या सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र अंनिस तर्फे करण्यात आलं. अधिक माहितीसाठी नंदकिशोर तळाशिलकर (9869170062) राज्य प्रधान सचिव, विजय परब (9869077462) राज्य सरचिटणीस, 9665040818 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.