
देवगड : तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासाला आता प्रत्यक्ष गती मिळाली असून, गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या बंदराच्या कामांना पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे चालना मिळणार आहे. बंदरातील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री राणे हे शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आनंदवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत जेटीचे बांधकाम, कार्यशाळा, जाळी विणण्याचे शेड तसेच गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. उर्वरित कामांनाही गती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मत्स्यबंदराच्या विकास आराखड्यात मासळी लिलावगृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, अंतर्गत रस्ते, उपहारगृह, मच्छीमारांसाठी विश्रांतीगृह तसेच रेडिओ वॉरन कम्युनिकेशन सेंटर आदी सुविधांचा समावेश आहे. ही सर्व उर्वरित कामे येत्या १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा महामंडळाचा मानस आहे.
दरम्यान, शुक्रवारच्या पाहणीदरम्यान बंदरातील सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, प्रस्तावित विकासकामांचे सादरीकरणही केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, कार्यकारी अभियंता कृष्णात निकम, प्रशासकीय अधिकारी किशोर साळगावकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुंवेसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आनंदवाडी मत्स्यबंदराचा विकास पूर्ण झाल्यानंतर परिसरातील मच्छीमारांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून, मासेमारी व्यवसायाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या पाहणी कार्यक्रमाकडे परिसरातील मच्छीमार आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाला सर्व मच्छीमार बांधव व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










