बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून वडील - मुलाचा मृत्यू

Edited by:
Published on: June 10, 2024 06:33 AM
views 1427  views

मुंबई: पहिल्याच पावसात विक्रोळी येथे रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून त्यात वडील-मुलाचा मृत्यू झाला. याबाबत विक्रोळी पार्कसाईट पोलीस अधिक तपास करत आहेत. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे रविवारी रात्री ही घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीजवळ नागेश रेड्डी (३८) हे सुरक्षारक्षकाचे काम करत होते.

रविवारी रात्रीही ते नेहमीप्रमाणे कामावर असताना त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा रोहित रेड्डी तेथे गेला होता. त्याचवेळी जोरात पाऊस आल्याने दोघेही तेथील छज्जाखाली उभे होते. त्याचवेळी अचानक छज्जाचा काही भाग दोघांच्या अंगावर कोसळला. काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, दोघाना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. शासनाने घटनेची तत्काळ दखल घेत संबंधित विकासकावर कारवाई करावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.