ठाणे : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक २०२३’ या क्रिकेट स्पर्धेला रविवारी ( १५ जानेवारी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली.
ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा असून यंदा त्यात अनेक संघ सहभागी झाले आहेत. टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी वेळात वेळ काढून मुख्यमंत्री या स्पर्धेला हजर राहिले.
डाव्होस येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रवाना झाले. तिथे जाण्यापूर्वी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. त्यांची ही कृती शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, टेंभी नाका बाळासाहेबांची शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर, नितेश पाटोळे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.