रोहा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान केला. राज्यपाल कोश्यारी हे सतत बहुजन समाजाचे महापुरुष यांच्याविरोधात वक्तव्य करीत आलेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा संताप आणणारे वक्तव्य केले आणि राज्यपालांविरोधात महाराष्ट्र पेटून उठला. सर्व जिल्हा, तालुक्यांत विविध संघटना, राजकीय पक्ष, बहुजन समाज संघटना राज्यपाल कोश्यारी यांचा जाहीर निषेध करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहा येथील नगरपरिषदेच्या समोर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात मंगळवारी जोरदार घोषणाबाजी झाली. नीम का पत्ता कडवा है.. असा संतापजनक एल्गार सहभागी सर्व समाज, राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करत निषेध व्यक्त केला.
दरम्यान, बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी खपवून घेणार नाही, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा, नाहीतर सर्व बहुजन समाज, राजकीय संघटना अधिक उग्र आंदोलन करतील, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार रोहा यांना देण्यात आले, तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधी आंदोलनात सामाजिक संघटना समवेत राष्ट्रवादी, शिवसेना राजकीय पक्षाचे नेतेगण, कार्यकर्ते एकत्र आल्याचे यानिमित्त समोर आले. बहुजन महापुरुषांचे अपमान करणाऱ्याविरोधात आपण एक राहू या अशा रोहा सिटीझन फोरमच्या आवाहनाला सर्वांनीच मोठा प्रतिसाद दिला.
राज्यपाल हटाव मोहीम राज्यात सर्वत्र सुरू झाली आहे. आधी युगपुरुष महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमानकारक भाष्य केले. आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार गरळ ओकत आहेत. त्याबद्दल संबंध महाराष्ट्रात प्रचंड असंतोष आहे. परत त्यात राज्यपालांनी अधिक भर टाकल्याने सर्व समाज, राजकीय संघटना आक्रमक झाल्या. राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध करत ठिकठिकाणी संताप व्यक्त झाला. रोहा येथे रोहा सिटीझन फोरमच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक, समाज मुख्यत: राजकीय पक्षानी प्रतिसाद देत वात्रट राज्यपालांविरोधात एल्गार करत पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
राज्यपाल हटाव आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस विजयराव मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख, रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, सलाम रायगडचे संपादक राजेंद्र जाधव, बौद्ध समाज युवा अध्यक्ष जितेंद्र गायकवाड,समिधा अष्टीवकर, अनंत देशमुख, रोहिदास पाशिलकर, प्रशांत देशमुख, संदीप सावंत, राजेश काफरे, राम नाकती,चंद्रकांत पार्टे,अनिल भगत, समीर दर्जी,अल्ताफ चोरडेकर,सूर्यकांत मोरे,अमोल देशमुख,अनिल देशमुख,बबन देशमुख, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपालांविरोधात प्रचंड घोषणाबाजी देत संताप व्यक्त केला. राज्यपालांना तातडीने पदावरून हटवत महाराष्ट्रातून हद्दपार करा, अन्यथा अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी यावेळी दिला. राज्यपाल हटाव अशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा निषेध करत फोटोला जोडे मारण्यात आले, यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात मुख्यत: पक्षीय मतभेद विसरून सत्ताधारी, विरोधक एक दिसल्याचे समाधानकारक चित्र अधोरेखीत झाले आहे.