सावंतवाडी : प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२३-२४ अंतर्गत पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ एकमुखी दत्त मंदिरास ४ कोटी ३४ लाख रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका अध्यक्ष जितेंद्र उर्फ जितू पंडित यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. दत्त महाराज व टेंब्ये स्वामींच्या आशीर्वादानं आपल्या पाठपुराव्यास यश मिळाल्याची भावना जितू पंडित यांनी व्यक्त केली.
शहरातील न्यु सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे. लोकवर्गणीतून हे मंदीर उभारलं जात आहे. पर्यटन संचलनालयाने मंदिर सुशोभीकरण तसेच भक्त निवास, प्रसादालय, सांस्कृतिक हॉल, पथ दिवे अशा सर्व कामासांठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास निधी मधून मंदिर सुशोभीकरणासाठी निधी मिळवून आणण्याकरिता पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका अध्यक्ष, सुंदरवाडी हेल्पलाईन फौंडेशनचे सचिव, DMC सिंधुदुर्गचे अशासकीय सदस्य जितेंद्र प्रभाकर पंडित यांनी मंदिराच्या बांधकाम समितीकढून आवश्यक असणारी कागदपत्र घेऊन पर्यटन संचनालायकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता. यासाठी ४ कोटी ३४ लाख रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सावंतवाडी शहराभाहेरून हायवे गेल्यामुळे सुट्टीच्या सीझन व्यतिरिक्त सावंतवाडीमध्ये येणाऱ्या लोकांची तसेच पर्यटकांची संख्या फार कमी झाली. यामुळे येथील पर्यटन व्यवसायिक त्रस्त झाले आहेत. शहरातील एकमुखी दत्तमंदिर हे जागृत दत्तमंदिर आहे. दत्त महाराज तसेच टेंबे स्वामींचा अधिवास या ठिकाणी कायम आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना त्याचा चांगला प्रत्यय येतो. या भागाचा सुशोभीकरण झाल्यास देश-विदेशातील भाविकांची सावंतवाडीतील या एकमुखी दत्त मंदिराला येण्याची संख्या वाढेल. त्यामुळे आपसूकच सावंतवाडीतील इतर व्यवसायांना देखील याचा फायदा होणार आहे, अर्थव्यवस्थेस हातभार मिळणार आहे. धार्मिक पर्यटनामुळे सुद्धा तेथील भागाचा विकास होतो. यादृष्टीने आपण पाठपुरावा केला होता त्याला दत्त महाराज आणि टेंबे स्वामीच्या आशीर्वादाने यश आले आहे. त्याभागाचा विकास झाल्यास नक्कीच सावंतवाडीच्या पर्यटनाच्या विकासात भर पडेल असा विश्वास जितेंद्र पंडीत यांनी व्यक्त केला आहे.