
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातही नगरपरिषद हद्दींचा ड्रोन सर्वे करून प्रत्येकाच्या भुखंडाला नकाशा स्कीम मधून ' स्वामित्व सनद ' देण्यात येईल, ग्रामीण भागातही याच पद्धतीने सर्व भूखंडांना स्वामित्व सनद देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्री श्री. बावनकुळे यांनी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत आ. दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख बबन राणे, गणेश प्रसाद गवस, नितीन मांजरेकर, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सामायिक जमिनी असून या जमिनींचे विभाजन करण्याबाबत कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे ज्यांच्या त्यांच्या जमिनी त्यांच्या त्यांच्या नावे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुकडे बंदी कायद्याचा आधार घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सामायिक जमिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकालात धडे वाटप पूर्ण करणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी-विक्री सुरू आहे. दिल्ली, हरियाणा तसेच अन्य परप्रांतातील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. मात्र, खासगी सामायिक क्षेत्रात खरेदी-विक्रीच्या नावाने फसवणूकीचे प्रकार घडत आहेत याबाबत आपण कोणती कारवाई करणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप पर्यंत आपल्याकडे प्राप्त नाही. मात्र, अशा प्रकारची तक्रार कोणी केली तर संबंधितांवर आपण कारवाई संदर्भात निश्चितच पावले उचलू असेही त्यांना स्पष्ट केले.
दरम्यान, महायुतीत तिन्ही पक्षांची आपली अशी एक मर्यादा रेषा ठरलेली आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून त्यासंदर्भात वेळोवेळी योग्य ती काळजी घेतली जात आहे. महायुतीत सुरुवातीलाच तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी महायुतीतील पक्षांतील नेते पदाधिकारी यांचे प्रवेश होऊ नये असे स्पष्ट संकेत दिले आहेत. महायुती म्हणून जनतेने आम्हाला जनाधार दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या बहुमताचा आदर होणारच, आमच्यात कोणतेही वाद नाहीत असेही त्यांनी यावे स्पष्ट केले. तर लोकसभा व विधानसभा निवडणुका होत असताना त्या त्यावेळी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतात. मतदान झाल्यानंतर देखील मतपेट्या सील करताना सर्व पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये चोरी होत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप हा धादांत खोटा आहे. निवडणुकांना एक वर्ष उलटून गेल्यानंतर ते ज्या पद्धतीने आरोप करीत आहेत ते केवळ राजकारण आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात त्यांच्या अधिक जागा आल्या त्यावेळी मतांची चोरी झाली नाही का ? असा उलट सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. आता भविष्यात नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या बुथ अध्यक्षांनी वेळीच मतदार याद्या तपासून घ्याव्यात. अन्यथा, विरोधी निकाल आल्यानंतर पुन्हा तेच रडगाणे गायले जाईल असा टोलाही हाणला.