सिंधुदुर्गनगरी : मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या अथक पाठ्यपुराव्यानंतर ओरोस इथ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनचे स्वप्न साकार झाले आहे. महाराष्ट्रातील हे पहिलेच स्मारक आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा उद्घाटन सोहळा होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला खासदार विनायक राऊत, सर्वश्री आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, नितेश राणे, वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.