'उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स' !

कविता हा माझा प्राण : डॉ. गोविंद काजरेकर
Edited by: विनायक गावस
Published on: November 11, 2023 14:38 PM
views 183  views

कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा', हे नवं अभियान सुरु करण्यात आलं आहे. या अभियान अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विशेष मालिकेच्या तिसऱ्या पुष्पात 'उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स', कोकणातील कृषीसंस्कृती आणि लोकगीते, राजन गवस यांचे कथात्मक साहित्य, मालवणीतल्या वाटा, सुन्नतेचे सर्ग असे कविता संग्रह, समीक्षा लेखक कोकणातील साहित्यिक, प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर यांची खास मुलाखत आपल्या समोर घेऊन येत आहोत. दै. कोकणसादचे संपादक संदीप देसाई आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर यांनी घेतलेली ही मुलाखत.

1. तुम्ही आजवर कविता, समीक्षा, लोकसाहित्याचे संशोधन, संपादन, पाठ्यपुस्तक अभ्यास मंडळासाठी लेखन, असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे. या सगळ्याकडे वळण्यापूर्वी तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी काय सांगाल? ग्रामीण कृषी परंपरेच्या पार्श्वभूमीचा तुम्हाला लेखनासाठी कसा उपयोग झाला?

माझा जन्म तळवडे गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील शेतकरी होते. शेतीवर उपजीविका होती. मोठी भावंडे शाळा शिकून नोकरीला मुंबईला गेली. त्यांनी कुटुंबाला हातभार लावला. मात्र, माझ आयुष्य हे खेडेगावात गेलं. शेतीसंस्कृतीचे संस्कार माझ्यावर होत गेले.लहानपणापासून कविता व मराठी भाषेचा ओढा होता. तिसरी, चौथीच्या कविता आजही पाठ आहेत. पाठांतर आणि वाचन या गोष्टी व्यक्तिमत्त्वात होत्या. हळुहळु त्याचा विकास होत गेला. उच्च शिक्षणा दरम्यान कवीवर्य डॉ.वसंत सावंत नावाचे ख्यातनाम कवी शिक्षक म्हणून लाभले. त्यानंतर संपूर्णतः आयुष्य बदलत गेल. भाषेकडे पहायचा दृष्टीकोन समजला. बारावीच एक वर्ष वाया गेलं. पण, ग्रंथालयाशी जोडलो गेलो. अनेक ग्रंथ, कादंबऱ्या जे-जे मिळेल ते वाचत जायचो. यातून लेखन, वाचनाची आवड निर्माण झाली. वसंत सावंत यांच्या प्रेरणेतून आपणही कवी व्हावं लेखक व्हावं अशी उर्मी दातट गेली. नोकरीला लागल्यानंतर अनेक साहित्यिक मित्र मिळत गेले. त्याचा फायदा झाला. पीएचडीच्या अनुषंगाने  समीक्षेकडे वळलो. दोन तीन पुस्तके समीक्षेची लिहीली गेली. घरात कोणतीही वाड्मयीन परंपरा नव्हती. पण, दशावतार, भजन, किर्तन यांची आवड होती. या संस्कार व प्रभावातून व्यक्तिमत्त्व घडत गेलं.

तुमच्या लेखनाची सुरुवात कवितेने झाली. कविता लिहिण्याकडे कसे वळलात ?

कवी होण्याची एक उर्मी डॉ.वसंत सावंत यांच्यामुळे मिळाली. त्यांच्यामुळे कवित्व निर्माण झाल. जन्मान मी काही कवी नव्हतो. पण, कविता लिहायची उर्मी होती त्यातूनच लिहु लागलो. पहिला कविता संग्रह 'उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स' २०१० ला आला. त्याला महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कारासह चार पुरस्कार मिळाले. सामाजिक बदल, जागतिकीकरण त्याचा खेड्यांपर्यंतचा प्रभाव, टिव्ही, संगणकासारख्या गोष्टी येत होत्या. यातून समाजाकडे पहायची प्रगतीशील दृष्टी मिळाली. कवितेत वेगळेपण जपलं. सिंधुदुर्गतील वाड्मयीन वातावरण देखील यासाठी फायदेशीर ठरलं. आमच्या कवितेतून गाव जसं दिसलं त्यातील विसंगती, जागतिकीकरणाचे बदल दिसले त्यातून कविता लिहीली. सामाजिक संबंध विखुरले जात होते. परस्परातील भावबंध टिकवून ठेवताना होणारी घुसमट पहिल्या संग्रहात आली. 

प्राचार्यासारखं प्रशासकीय जबाबदारीच काम करताना सृजनशीलता मारली जाते का ?

प्रशासकीय व्यवहार काटेकोर वस्तूनिष्ठपणे करावे लागतात. त्याला शासकीय नियम असतात. आपण अडकतो त्यात, थोडासा परिणाम होतो. पण, अनेक लोकांनी प्रशासनात राहून देखील उत्तम साहित्य दिलं आहे. दोन गोष्टीत गल्लत करता नये. दोघांचे परिणाम मनावर करून घेता नये असं ठरवलं तर ते शक्य होईल. पहिलच वर्ष असल्यानं माझी थोडीशी दमछाक होते. पण, साहित्य निर्मिती अधिक काळ टिकून राहील यासाठी सातत्याने काम करणं महत्त्वाची बाब आहे. सामाजिक बदल होवो न होवो आपण सतत घाव घालत रहाण जसं अण्णाभाऊ साठे म्हणाले, परिवर्तनासाठी, सामाजिक समतेसाठी, समाजातील विसंगतीवर बोट ठेवण हे लेखकाच पहिलं कर्तव्य असतं. ते त्यानं निर्भिडपणे केल पाहिजे. प्रशासकीय व्यवहार असतील तरी थोडंसं बाजूला ठेऊन समाजासाठी निर्भिडपणे काम करावं.

'उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स' या तुमच्या कविता संग्रहाला महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. या संग्रहानेच तुम्हाला महाराष्ट्रात ओळख दिली. काय सांगाल ? दुसऱ्या कविता संग्रहाला पुरस्कार प्राप्त झालेत. अनेक पैलू यातून उलगडलेत

'सुन्नतेचे सर्ग' हा कविता संग्रह तब्बल १२ वर्षांनी आला.  आणीबाणीवर लिहीलेल्या दिलीप चित्रेंच्या कवितेत हे शिर्षक सापडलं. २०१४ नंतर भारतात सामाजिक वास्तव जे बदलत गेलं. त्यातून लोक हतबल होत राहिले. नवी धोरण राबविली गेल्यानंतर त्या राजकीय वास्तवाचा लोकमानसावर परिणाम दिसू लागला, त्याच संचित येत गेलं. दहा वर्षातील वास्तवाच ते चित्र आहे. समाजाचा तोटा होत आहे. भ्रामक राष्ट्रवाद उभे करून छळवणूक होत आहे. ज्या घटनांतून सामान्य माणसाला हादरे बसत आहे अशा मुकेपणा विषयी भाष्य केलं आहे. कोव्हिड काळात अनेक माणसं रेल्वेतून चिरडली गेली. भाकरीवर रक्त सांडल यातून संवेदन निर्माण होत गेलं. माकडताप सारख्या घटनेत माकडान माणसे मारली की माणसाने माकडे मारली ? सरकारला याचा शोध घेता येता नाही असं अवतीभवतीच पाशवी पण मांडलं. आदीच्या संग्रहात आत्मनिष्ठ भावनांशी खेळत खेळत आपण कविता लिहीत असतो. पण, नंतर आत्मनिष्ठता पुरत नसते‌. समाज वाचल्याशिवाय गत्यंतर नसत. साहित्य कृती स्वतःला सुखवणारी असू नये. कवीची भुमिका ही जागल्याची असते. त्यानं समाजाला सतत जाग करत राहिलं पाहिजे. 

कवितेच्या मुळाशी कोकण आहे. आपण कृषीसंस्कृतीवर संशोधन केलं आहे. काय सांगू इच्छिता त्याबद्दल ?

कोकणातील कृषीसंस्कृती आणि लोकगीत हा संशोधन प्रकल्प घेतला होता. युजीसीकडून संशोधन प्रकल्प म्हणून मंजूर झाला होता. यावेळी लक्षात आलं लहानपणापासून आपण या संस्कृतीत जगत आहोत. नाचणी कापून आणली पहिली भाकरी बनली की ती शेतातील पशू पक्षांना घालण्याच काम आई करायची. निसर्गाविषयी कृतज्ञता कृषीसंस्कृतीतील जाणीव झाली होती. गाव रहाटीचह निरिक्षण करण हा लहानपणापासूनचा छंद होता. देवदेवसकी, पाषाण, विराचा चाळा याबद्दल चिकित्सेने माहिती घेत होतो. पुरुषांची टिपरी गीत खेळत असून त्याच आकर्षण होत. या सगळ्या संस्कृतीच, गीतांच संकलन करत गेलो. लोकसाहित्य विषय होता त्यातूनही या जाणीवा झाल्या. याबरोबरच गावोगावच्या बदलत जाणाऱ्या बोली भाषेचा अभ्यास करता आला‌. जगलेली संस्कृती असल्यानं अधिक आत्मियता होती. इथली लोकदैवत, पशुपक्षी, लोकसंकेत मांडत गेलो. 

आधुनिक युगात बऱ्याच गोष्टी हरवत चालल्या आहेत. ते वेगळेपण कसं जपावं ?

कित्येक पिढ्यांआधी अशिक्षित महिलांनी समुद्राचे उल्लेख केले. लग्न गीतातून ओव्यातून समुद्राची श्रीमंती लोकगीतातून टिकवली. ही टिकवून ठेवण ही आपल्या पिढीची गरज आहे. नव्या पिढी पर्यंत ती पोहचवली पाहिजे. सावंतवाडी संस्थानच्या संदर्भापासून व्यापारी येत होते असं समृद्ध लेखन त्या काळातील पहायला मिळत. कोकणात एक समृद्ध वैद्य परंपरा होती. ती नामशेष होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. गायतोंडे यांनी वैद्यांना एकत्र करून प्रकल्प राबवायचा प्रयत्न केला. तसंच, लोकसाहित्याच देखील शासनस्तरापासून उपक्रम राबवून नव्या पिढीला त्याची ओळख करून दिली पाहिजे.

नवीन अभ्यासक्रमात संस्कृतीच संकलन करता येईल का ?

नविन शैक्षणिक धोरणात बोली भाषेला महत्त्व दिलं आहे. केंद्रशासनाने देखील तरतूद केली आहे. विद्यार्थांना बोलींचा परिचय करून देण, कविता भाषांतरीत करण, बोलीचा अभ्यास हा स्वतंत्र पेपर सुरु केला आहे. मुंबई विद्यापीठात आग्री बोली, मालवणी बोली त्या त्या प्रदेशातील मुलांनी शिकावं यासाठी प्रयत्न केले होते. नव्या शैक्षणिक धोरणात बोलीच अभ्यासत्र सुरु होईल. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं शक्य होईल. तर साहित्य संस्थानी देखील बोली टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. बोलीत बोला ही भाषण स्पर्धा काही ठिकाणी घेतली होती. नव्या गोष्टी बोलीतून सुरु केल्या तर त्याची व्यवसाय संधी आहे. मालिकेतील बोलीच्या लेखनासाठी ती संधी आहे. चांगलं बोलीतल लेखन करता येईल. गोतावळा कांदबरी, पाचोळा अशी पूर्ण मालवणीत असणारी एकही कादंबरी आपल्याकडे नाहीत. बोलीतल भाषिक वैभव पकडता आल तर बोली अधिक समृद्ध करता येईल.

तुम्ही ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या साहित्यावर पीएचडी केली. हाच विषय  निवडावास का वाटलं ?

डॉ.राजन गवस हे मराठी साहित्य लेखनताले सशक्त लेखक आहेत. ज्यांनी शहरांकडे माणसाच्या शोषणाची केंद्र म्हणून पाहिलं. महागाव, गावाचा, घराचा कोपरा न कोपरा साहित्यात कसा येईल हे त्यांनी मांडलं. एक संस्कृतीनिष्ठ लेखक म्हणून त्यांच्याकडे वळलो‌. वसंत सावंत यांच्या कवितेवर पीएचडी करायची होती. राजन गवस यांनी उपेक्षितांची परंपरा आहे त्यापलीकडल जीवन जोगते, देवदासी यांचे संदर्भ त्यांच्या समग्र साहित्यातून मांडले. शोषणाच्या असंख्य तरा, त्याच प्रत्ययकारी चित्रण गद्य लेखन करून त्यांनी केल. यावरच संशोधन नैतिक जबाबदारीतून केल.

तुमच्या समीक्षा कवितांविषयीची आहेत. त्याच एक पुस्तकही आहे हे कसं ?

कदाचित त्या प्रबंधातून दडपलेल्या भावना होत्या. मला कवितेचा अभ्यास करायचा होता. पिंड तो असल्यानं त्यावर लिहायच होत. त्यामुळे त्यावर लिहील. कविता हा माझा प्राण आहे. त्यामुळे कविता आणि कवितेची समिक्षा लिहायाची अशा तऱ्हेने पिंड घडत गेला.

बदलत्या वास्तवाप्रमाणे कवी कादंबरीकडे वळले आहेत. तुमच्या मनात अस काही येत का ?

कोकणातील बदलेल वास्तव यावं अशी कादंबरी लिहावी असं वाटतं. एक 'आडमेळी' शब्द घेऊन आठ दहा पानं लिहायचा प्रयत्न देखील केला‌. पण, त्या कादंबरी लेखानाला खुप श्रम करावे लागतात. त्यामानाने कविता लिहीण सोपं असतं. बाकीची व्यवधानही असतात. शेतकरी असल्यान शेतीही सांभाळतो. शेती टिकली तर संस्कृती टिकेल. या साठमारीत काही गोष्टी करता येत नाही. भविष्यात एखादी कादंबरी लिहून होईल अशी आशा बाळगली आहे‌.

आजच्या काळात कोकणात कथाकार, नाटककार दिसत नाहीत. याबाबत का सांगाल ?

असा एक दुष्काळाचा काळ येतो. पुर्वीचे लेखक मुंबईत गेले. सुखासीन आयुष्य झाल्यावर ते लिहू लागले. अलिकडच्या काळात बदलेल्या चंगळवादात माणसाला शॉर्ट कट हवे असल्यानं नवी पिढी अधिक दिसत नाही. श्रम कमी झाल्यानं तसं लेखन होताना दिसत नाही. 

प्राचार्य म्हणून मोठी जबाबदारी आपण पार पाडत आहात. आपल्या आगामी लेखनाचे संकल्प काय असतील ?

कादंबरी लिहून पहायचा संकल्प आहे. तो हळूहळू पुर्ण होईल असं वाटत. बाकी समिक्षा लेखन व कविता सुरु आहेत. सांस्कृतिक अंगाने गावगाड्याच समाज सांस्कृतिक अंगाने जे संचित आहे त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे. भाषिक अंगाने संशोधन करायचं आहे. जसं 'ठिय्या' देणे हा शब्द सुताराचा आहे जो आंदोलनाला वापरला गेला. 'हरताळ फासणे' पूर्वी एखादा शब्द चुकला तर त्याला हळद लावून तो मिटवला जायचा त्यातून हा शब्द आला. 'धाबे दणाणणे' छपराच धाब विज चमकली की दणाणायच अशा समाजातील परंपररेतून आलेल्या भाषा व्यवस्थेन भाषेला खूप दिलं आहे. ते नेमकं शोधून काढायचा संकल्प आहे.