
मालवण : कालावल खाडी पात्रातील अति संवेदनशील वाळू गट बी व उपगट बी 4 व बी 5 या वाळू गटाचे लिलाव होऊ नये अशी मागणी खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कालावल खाडीपात्रात अतिशय संवेदनशील अशी परंपरागत मनुष्य वस्ती, जैवविविधतेने संपन्न असणारी बेटे आहेत. या वाळू गटाच्या नजीकच पांडवकालीन बंधारा आजही अस्तित्वात आहे. मालवण तालुक्यात येणारा पर्यटक मोठ्या संख्येने या बेटांना व पांडवकालीन बंधारा बघण्यासाठी या भागात येत असतात. खाडीपात्रात अनेक मत्स्य बीजे, कांदळवन आजही अस्तित्वात आहे.
वाळू उत्खननामुळे या भागातील जैवविविधता संपूर्णतः नष्ट होणार असून पांडवकालीन बंधाराही नष्ट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या बंधाऱ्यामुळेच गड नदीचा प्रवाह कालावल खाडीपात्रात काही प्रमाणात रोखला जाऊन या भागातील बेटे सुरक्षित आहेत. परंतु या भागात वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणे होऊ लागल्यास हा पांडवकालीन ठेवा नाहीसा होऊन खाडीपात्रातील बेटे ही नाही होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सततचा वाळू उपसा यामुळे बेटांची प्रचंड हानी होत आहे. या वाळू गटाच्या जवळच कालावल ब्रिज असून अति वाळूउपसामुळे या ब्रिजला सुद्धा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
आम्ही बेटावरील ग्रामस्थ आपणास नम्रतापूर्वक विनंती करतो की, या वाळू गटांचे लिलाव प्रक्रिया तात्काळ थांबून अनधिकृत वाळू उपसाही रोखण्यात यावा ही विनंती करण्यात आली आहे.










