
सावंतवाडी : आंबोली-कोल्हापूर मार्गावरील नांगरतास येथे एका फॉर्म हाऊसवर दिवसाढवळ्या ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळवल्याची धक्कादायक घटना ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता घडली. मात्र, सावंतवाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांच्या विक्रमी वेळेत छडा लावत, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी (ता. हातकणंगले) येथून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, यामुळे पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे कौतुक होत आहे.
नांगरतास येथील मायकल डिसोजा यांच्या फॉर्म हाऊसवर श्रीमती सुहासिनी बाळकृष्ण राऊत (वय ६०, रा. आंबोली) या कार्यरत आहेत. बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आंबोलीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून एक अनोळखी इसम खाली उतरला. त्याने सुहासिनी राऊत यांच्याकडे पाण्याची बाटली देऊन पिण्यासाठी पाणी मागितले. राऊत यांनी पाणी दिल्यावर, तो बाटली घेऊन गाडीकडे परत जात असताना त्याने अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. या हिसकाझटकीत मंगळसूत्र तुटले आणि त्याचा अर्धा भाग जमिनीवर पडला. मात्र, उर्वरित सुमारे ६० हजार रुपये किमतीचा सोन्याचा अर्धा भाग घेऊन तो इसम गाडीत बसला. या चोरट्यासोबत गाडीत आणखी दोन संशयित होते. मंगळसूत्र हिसकावल्यानंतर तिघेही संशयित आरोपी लगेच गाडी घेऊन कोल्हापूरच्या दिशेने वेगाने पसार झाले.
या घटनेनंतर फिर्यादी श्रीमती सुहासिनी राऊत यांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तीन अज्ञात इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, गौरव परब आणि सचिन चव्हाण यांचे विशेष पथक तात्काळ तपासाला लागले. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच त्वरित सूत्रे हलवून सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. हुपरी पोलीस ठाणे (जि. कोल्हापूर) तसेच हातकणंगले येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात यश मिळवले. सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिन्ही संशयित आरोपी हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ व हुपरी परिसरातील रहिवासी आहेत. या संशयित आरोपींना आज पहाटे अटक करण्यात आले असून, त्यांना. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची १० नोव्हेंबर पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलिसांनी लवकरच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी आणि चोरलेले सोने देखील हस्तगत करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास हवालदार संतोष गलोले हे त्यांच्या पथकातील हवालदार रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे, गौरव परब आणि चालक सचिन चव्हाण यांच्या मदतीने करत आहेत. या जलद कारवाईमुळे या प्रकारच्या गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे.










