
खानापूर : सुळेगाळी परिसरात रविवारी पहाटे दोन हत्तींचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील सुळेगाळी जंगल परिसरातून हत्तींचा कळप शनिवारी रात्री गावाच्या हद्दीत शिरला होता. शेती क्षेत्राजवळील वीजवाहिन्यांना स्पर्श झाल्याने दोन हत्ती जागीच कोसळले. स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या आवाजानंतर बाहेर येऊन पाहिले असता, दोन्ही हत्ती मृत अवस्थेत आढळून आले. वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्यक तसेच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत हत्तींचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत असून, वारंवार होत असलेल्या अशा अपघातांमुळे वीजवाहिन्यांची उंची व सुरक्षा तपासणी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
हत्तींच्या मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमींतही दुःख व्यक्त होत आहे. वनविभागाकडून या प्रकरणी अधिकृत अहवाल तयार केला जात असून, वीज खात्यालाही नोटीस देण्याची शक्यता आहे.














