कोकणातल्या रिफायनरीसाठी आता 'डबल इंजिन'

उद्योगमंत्री सामंत यांच्यासोबत रिफायनरीसाठी त्यांचे बंधू किरण सामंतही मैदानात !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 28, 2022 15:00 PM
views 281  views

सिंधुदुर्ग : एकीकड सलग दुसरा मोठा प्रकल्प राज्याबाहेर जात असतानाच कोकणात होणाऱ्या सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पासाठी मात्र डबल इंजिन प्रयत्न होताना दिसत आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच त्यांचे बंधू किरण सामंतही रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी आता मैदानात उतरलेत. 


महाराष्ट्राच्या अर्थकारणाला गती देणारा सलग दुसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी मात्र 'डबल इंजिन' प्रयत्न होताना दिसत आहेत. रत्नागिरीचे सुपुत्र उदय सामंत राज्याचे उद्योग मंत्री झाल्यानंतर प्रकल्प समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. या संदर्भात उद्योग मंत्री सामंत यांनीही आपली भूमिका जाहीररित्या स्पष्ट केली होती. या प्रकल्पामुळ कोकणातील अर्थकारणाला गती मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्यान रिफायनरीसाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देवू, अशी घोषणा त्यांनी नुकतीच केली होती. 


उद्योगमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर आता त्यांचे बंधू, उद्योजक किरण सामंतही रिफायनरीच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेत. कोकणच्या विकासाला गती आणि तरुणांना रोजगार देण्यासाठी रिफायनरी प्रकल्प आवश्यक असल्याचं मत किरण सामंत यांनी नुकतच व्यक्त केलय. सिंदूरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवरही त्यांची निवड झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि विकास क्षेत्रांची निवड करून सूक्ष्म आराखडा तयार करण आणि त्या आधारे अंमलबजावणी करून पर्यावरणक्षम शाश्वत विकास करण, हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळेच या प्रकल्पाला कोकणातून समर्थन मिळवण्याबरोबरच तो पूर्णत्वाकड नेण्यासाठी किरण सामंत यांनी कंबर कसली आहे.


एकीकडे शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे रिफायनरीसाठी सुरू असलेले प्रयत्न आणि त्याचबरोबर कोकणातील किंगमेकर म्हणून ओळख असलेले त्यांचे बंधू किरण सामंत आता मैदानात उतरल्यान रिफायनरी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी 'डबल इंजिन' प्रयत्न होताना दिसत आहेत.