कुडाळ : एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रीटेंडेंट डॉ. आर. एस. कुलकर्णी यांना अलनॉर स्टायलाईड फ्रॅक्चर इन डिस्टल रेडियस फ्रॅक्चर या विषयावर अभूतपूर्व संशोधन केल्याबद्दल, डॉ. के. टी. ढोलकीया गोल्ड मेडल डॉ. श्यामा मुखर्जी इनडोअर स्टेडियम पणजी, गोवा येथे ६६ व्या ऑल इंडिया ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स या कार्यक्रमात प्रो. डॉ. नवीन ठक्कर (सेक्रेटरी, इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन) यांनी जाहीर केले होते. हे गोल्ड मेडल गुरु नानक देव युनिव्हर्सिटी, अमृतसर पंजाब येथे बुधवारी ६७ व्या ऑल इंडिया ऑर्थोपेडिक कॉन्फरन्स इनॉग्रल सेरिमनी मध्ये प्रो. डॉ. रमेश सेन (अध्यक्ष, इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन) आणि प्रो. डॉ. नवीन ठक्कर (सेक्रेटरी, इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सदर गोल्ड मेडल डॉ. आर. एस. कुलकर्णी यांना त्यांनी अलनॉर स्टायलाईड फ्रॅक्चर इन डिस्टल रेडियस फ्रॅक्चर या विषयावर केलेले प्रेझेंटेशन आणि तब्बल तीन दशके केलेल्या संशोधनासाठी देण्यात आले असून या मध्ये १९८६ ते २०१६ पर्यंत ४६७२ रुग्णांवर भारत देशामध्ये कोलीज फ्रॅक्चर वर एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधन प्रसिद्ध केलेले एकमेव ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून संपूर्ण भारत देशात त्यांचे नावलौकिक झाले आहे.
डॉ. आर. एस. कुलकर्णी यांना ऑर्थोपेडिक क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील के. टी. ढोलकीया गोल्ड मेडल जे एका वर्षी भारतातील एकाच ऑर्थोपेडिक सर्जनला त्यांच्या संशोधन कार्यासाठी दिले जाते हे प्राप्त झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.